आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वाला-अश्विनी स्पर्धेबाहेर; एकेरीत पी. व्ही. सिंधू पुढच्या फेरीत दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकाऊ - भारतीय स्टार आणि पाचवी मानांकित पी.व्ही. सिंधूने कोरियाच्या किम ह्यो मिनवर संघर्षपूर्ण विजय मिळवून १ लाख २० हजार डॉलर बक्षीस रक्कम असलेल्या मकाऊ ओपन ग्रां.प्री. बॅडमिंटन स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. महिला दुसरीत भारताची नंबर वन जोडी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना मात्र पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.
सिंधूने मिनला ४१ मिनिटांत २१-१३, २२-२० ने हरवले. ज्वाला आणि अश्विनीला जपानची युकी फुकुशिमा आणि सयाका हिरोता यांच्याकडून ३६ मिनिटांत १६-२१, १५-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला. पुुरुषांत नववा मानांकित अजय जयरामला चीनच्या लीन गुईपूने दुसऱ्या फेरीत ३५ मिनिटांत ११-२१, १७-२१ ने पराभूत केले.
प्रणय, प्रणीतही जिंकले
सातवा मानांकित एच.एस. प्रणय आणि १५ वा मानांकित बी. साई प्रणीत यांनी भारताचे आव्हान कायम ठेवले आहे. दुसऱ्या फेरीत प्रणीतने विश्व क्रमवारीत २०५ व्या क्रमांकावरच्या उझबेकिस्तानच्या आर्टियोम सावातयुगिनला २१-११, २१-८ ने सरळ गेममध्ये हरवले. प्रणीतचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या आंद्रे कुर्निवायन यांच्याशी होईल. इतर एका लढतीत प्रणयने
विश्व क्रमवारीत २९९ व्या क्रमांकावरचा चीन तैपेईचा लीन चिया सुआन याला अवघ्या ३२ मिनिटांत हरवले.

प्रणयने हा सामना २१-१९, २१-१५ ने जिंकून पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. विश्व क्रमवारीत १९ व्या क्रमांकावर असलेल्या प्रणयसमोर आता क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ८१ वा मानांकित चीनच्या कियाओ बिनचे आव्हान असेल. कियाओ बिनने १४ वा मानांकित मलेशियाच्या वेई फेंग चोंगला ४० मिनिटांत २१-१६, २१-८ ने हरवले. भारतीय आणि चिनी खेळाडू प्रथमच समोरासमोर येतील.
सिंधूवरच भारताची मदार
कोरियाच्या किमविरुद्ध सिंधूने पहिला गेम सहजपणे जिंकला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये किमने चांगली झुंज दिली. एकवेळ दोन्ही खेळाडू २०-२० असे बरोबरीत होते. यानंतर सिंधूने सलग दोन गुण मिळवत बाजी मारली. या स्पर्धेत दुखापतीमुळे सायना नेहवाल खेळू शकली नाही. यामुळे पी.व्ही. सिंधूवरच भारताची मदार असेल. सिंधूने पहिल्या फेरीचा अडथळा दूरा केला असला तरीही तिच्यासमोर पुढे चीनच्या खेळाडूंचे आव्हान असेल.