आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधूचा आक्रमक खेळ, मकाऊ ओपनमध्ये सिंधूने केली किताबाची हॅट्ट्रिेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकाऊ - स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने मकाऊ ओपनमध्ये शानदार प्रदर्शन करताना किताब जिंकण्याची हॅट्ट्रिेक केली आहे. तिने रविवारी फायनलमध्ये जपानच्या मिनात्सू मितानी हिला २१-९, २३-२१, २१-१४ ने हरवले. सिंधूचे हे या वर्षाचे पहिले विजेतेपद ठरले आहे. मात्र, सिंधूने येथे २०१३ आणि २०१४ मध्येसुद्धा विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेचे सलग तीन वर्षे विजेतेपद जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.

पाचवी मानांकित सिंधू आणि सहावी मानांकित मितानी या दोघी दुसऱ्यांदा समोरासमोर होत्या. यापूर्वीच्या लढतीत मितानीने सिंधूला हरवले होते. मात्र, फायनलमध्ये मितानीला पराभूत करून सिंधूने जुन्या पराभवाची परतफेड केली. फायनलमध्ये सिंधूने मितानीला विजयाची संधी दिली नाही. भारतीय बॅडमिंटनपटू सिंधूने पहिला गेम सहजपणे २१-९ ने जिंकून आगेकूच केली. पहिल्या सेटनंतर सिंधू सहजपणे फायनल जिंकेल, असे वाटत होते. मात्र, मितानीने दुसऱ्या गेममध्ये सिंधूला जोरदार झुंज दिली. दुसऱ्या गेममध्ये एकेका गुणासाठी संघर्ष रंगला. २१-२१ असा गेम बरोबरीत असताना सलग दोन गुण मिळवत मितानीने २३-२१ ने दुसरा गेम आपल्या नावे केला. यानंतर सामना १-१ असा बरोबरीत झाला.

सिंधूचा आक्रमक खेळ
तिसऱ्या गेममध्ये जबरदस्त प्रदर्शन करताना सिंधूने २१-१४ ने विजय मिळवला. तिसरा गेम तिने मोठ्या अंतराने जिंकला. सिंधूने दुसऱ्या गेममध्ये केलेल्या चुका टाळताना तिसरा गेम जिंकला.

सलग तिसऱ्यांदा जिंकले विजेतेपद
सिंधूने फायनलची झुंज १ तास आणि ६ मिनिटांच्या संघर्षानंतर जिंकली. या विजयासह तिने सलग तिसऱ्यांदा मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे. तिने २०१३ मध्ये कॅनडाच्या ली मिशेलला फायनलमध्ये हरवले होते. तर २०१४ मध्ये सिंधूने दक्षिण कोरियाच्या किम यो मिनला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते. या वेळी जपानच्या मितानीला तिने मात दिली. फायनलमध्ये तिने लीगपेक्षाही अधिक आक्रमक आणि चपळ खेळ केला.

हा शानदार विजय ठरला. ही हॅट्ट्रिेक असल्याने मी आनंदी आहे. एकूणच स्पर्धेत माझी कामगिरी चांगली झाली. पहिला गेम सोपा तर दुसरा गेम खूप कठीण होता.
- पी. व्ही. सिंधू, विजयानंतर.

कोरियाचा जियोन पुरुष गटात विजेता
एक लाख २० हजार डॉलर बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा किताब दक्षिण कोरियाच्या जियोजन हियोग जीन याने जिंकला. १३ वा मानांकित जियोनने फायनलमध्ये चीनच्या तियान हुवेई याला २१-११, १३-२१, २३-२१ ने हरवले. सामना १ तास तीन मिनिटांपर्यंत रंगला.

२०१३ व
२०१४
मध्ये सिंधूने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकले.

सिंधूची पाच विजेतेपदे अशी
वर्ष स्पर्धा विरोधी खेळाडू
२०११ इंडोनेशिया इंटरनॅशनल फ्रान्सिस्का रत्नासरी
२०१३ मलेशिया मास्टर्स ग्यू जुआन
२०१३ मकाऊ ओपन ली मिशेल
२०१४ मकाऊ ओपन किम यो मिन
२०१५ मकाऊ ओपन मिनात्सू मितानी