आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दी ‘आकाश’ची भारतीय हॉकी संघात भरारी, कठीण परिस्थितीवर मात करून मारली मजल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घरात अठराविश्वे दारिद्र्य, वडील एकटेच कमावते. मात्र, जिद्द आपल्या विलक्षण यशोशिखरावर पोहोचण्याची. लहानशा शहरात तासन््तास सराव करत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे डोळ्यात स्वप्न... अशा परिस्थितीत यवतमाळात घडलेला आकाश चिकटे हॉकीत देशाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला विदर्भीय आणि मराठी खेळाडू बनला आहे. मलेशियात खेळल्या जात असलेल्या अझलनशहा हॉकी कप स्पर्धेत तो सध्या भारताकडून खेळत आहे.

निळी जर्सी घालून देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली याचा सार्थ अभिमान वाटत असल्याची भावना आकाशने थेट मलेशियातून ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. यवतमाळ शहराच्या अमरावती मार्गावरील लोहारा या मागासलेल्या वस्तीत अाकाश चिकटेचे घर.. आई बेबी गृहिणी आणि धाकटा भाऊ सूरज. वडील अनिल यांचे वेल्डिंगचे दुकान.. घरची परिस्थिती तशी बेताचीच. मात्र, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या बळावर आकाशने गाठलेले यशोशिखर प्रशंसनीय आहे. यवतमाळच्याच साई माध्यमिक विद्यालयात आकाशचे शिक्षण झाले. स्टिक आणि चेंडू हाताळण्यातील आकाशचे कसब शाळेचे मुख्याध्यापक मनोज इंगोले यांनी त्याला प्रोत्साहित केले. त्यानंतर शालेय, जिल्हा, राज्य आणि अन्य स्पर्धांमध्ये आकाशने आपल्या दर्जेदार कामगिरीची चुणूक दाखवली. नुकत्याच पार पडलेल्या कोल इंडिया हॉकी प्रीमियर लीगमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत निवड समितीला त्याची दखल घेण्यास बाध्य केले.

कठोर मेहनत, तरीही संधी नव्हत्या
मागासलेल्या जिल्ह्यात आकाश जीवतोड मेहनत घेत होता. मात्र, अपुऱ्या सुविधांमुळे त्याला यशाची किनार लाभली नाही. २००७ मध्ये पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत त्याला प्रवेश मिळाला. तब्बल ५ वर्षे त्याने या ठिकाणी घाम गाळला. अशातच कुटुंबीयांपुढेही आर्थिक पेच निर्माण झाले होते. त्यामुळे २०१२ मध्ये आकाशने नोकरी करण्याचे ठरवले.
किट नसल्याने राष्ट्रीय स्पर्धेला मुकला
आकाश आर्थिक परिस्थितीमुळे हतबल झाला होता. २००७-०८ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. मात्र, हॉकी किटही नव्हती. ती घेण्याची परिस्थितीही नव्हती. शाळेकडेही अपुऱ्या किट होत्या. त्यामुळे या शिबिराला मला दोन दिवस मुकावे लागले. नंतर शाळेने किटची व्यवस्था केल्याने मी जाऊ शकलो. तेव्हा शिबिरास गेलो नसतो तर आज संघापर्यंत पोहोचलो नसतो, असे ताे म्हणाला.
लष्कराची शिस्त शिकून केली वाटचाल
मे २०१२ मध्ये बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये झालेल्या भरतीत आकाशने भाग घेतला आणि लष्करात हवालदार बनला. त्यानंतर कुटुंबीयांसोबतच स्वत:चीही आर्थिक घडी काहीशी जमली. लष्कराच्या शिस्तीमुळे ध्येयाकडे मार्गस्थ होताना स्वत:ला कधीच ढासळू द्यायचे नाही हे आपण शिकलो, असे आकाश सांगतो.