आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात लवकरच हाॅकी अकादमी ! माजी हाॅकीपटू धनराज पिल्ले यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- हॉकी हा देशाचा राष्ट्रीय खेळ असला तरी त्याचा हवा तसा विकास झालेला नाही. पूर्वीच्या खेळापेक्षा आज नियम, तांत्रिक बाबी यात अनेक बदल झाले आहे. राष्ट्रीय खेळाचा विकास साधण्यासाठी प्रत्येक राज्यात हॉकीच्या किमान पाच तरी अकादमी असावे, असे मत भारतीय संघातील हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी व्यक्त केले. त्यासाठी अाता लवकरच पुणे आणि मुंबई येथे अकादमी सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शहरातील एमराल्ड हाइट्स स्कूलमध्ये सीबीएसई पश्चिम विभाग हॉकी स्पर्धेच्या उद््घाटनासाठी ते शहरात आले असता ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी हॉकीच्या स्थितीबद्दल भावना व्यक्त केल्या.

देशासाठी खेळणारे नवीन चांगले खेळाडू घडवण्यासाठी अकादमी निर्माण करणे महत्त्वाचे आहे. आपल्या संघातील माजी खेळाडू यांच्या कौशल्याचा उपयोग करुन घेता येईल. या प्रशिक्षकांकडून नवीन खेळाडू उत्कृष्ट तयार होऊ शकतो. यासाठी फक्त शासनाने नियोजनपूर्ण आखणी करुन अकादमी सुरू करावी, असे विचार त्यांनी मांडले. सध्या ते गुजरात येथे ९० खेळाडूंना प्रशिक्षण देत अाहे.

ब्राझील येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताची तयारी जोमात सुरू असून एक तरी सुवर्ण किंवा रजतपदक पटकावण्याचा धनराज पिल्ले यांचा मानस आहे. त्यांनी भारतीय संघाच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतानाच नवीन खेळाडू तयार होण्यासाठी प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात अकादमी आवश्यक असल्याचे सांगितले. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यासाठी शाळेने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. यासोबत खेळाडूच्या आतील कौशल्याला योग्य वेळी योग्य जागा मिळाली तर त्याचे चीज होते. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हॉकीच्या स्पर्धा नियमित घेतल्या पाहिजेत.

काैशल्याला फटका
हॉकीमधील बदलांचा फटका खेळाडूच्या कौशल्याला बसला आहे. पूर्वी खेळाडूचे कौशल्यपूर्ण खेळ पाहायला मिळत होते. पण आता हिट अँड रन अशी हॉकी झाली आहे. त्यामुळे कौशल्य कमी झाले आहे. या कौशल्याला चालना मिळायला हवी. एकदम अंतिम सामन्याचा विचार करण्यापेक्षा प्रत्येक टप्प्याटप्प्यानुसार सामने खेळावे. यामुळे खेळातील सातत्य टिकून राहते. आपण योग्य दिशेने जात आहोत, पण त्यासोबत योग्य निवड होणे आवश्यक आहे.