पेनांग - प्रीमियर बॅडमिंटन लीगच्यात तब्बल दोन आठवडे रंगलेल्या थरारानंतर आता भारतीय बॅडमिंटनपटू यंदाच्या सत्राला नव्याने दमदार सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहेत. सत्रातील पहिल्या ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. बुधवारपासून मलेशिया मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे.
जागतिक स्पर्धेतील दोन वेळची कांस्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि २०१४ मधील चीन ओपन चॅम्पियन के. श्रीकांतची नजर आता सत्रातील पहिल्या किताबावर असेल. हे दोन्ही खेळाडू अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पीबीएलमध्ये या दोन्ही युवा खेळाडूंनी सरस कामगिरी केली. याशिवाय महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा आपले नशीब आजमावणार आहेत.
सायली राणे बाहेर
स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी झालेल्या पात्रता फेरीत भारताची युवा खेळाडू सायली राणे अपयशी ठरली. तिला महिला एकेरीच्या लढतीत मलेशियाच्या यिन फुन लिमने पराभूत केले. लिमने १२-२१, २१-१९, १८-१७ ने विजय मिळवला. त्यामुळे तिला मुख्य फेरीला मुकावे लागले.
सिंधूसमोर सर्बिनाचे आव्हान
महिला एकेरीच्या सलामी सामन्यात जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या पी.व्ही. सिंधूला स्विसच्या सर्बिना जाक्युटच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. बाजी मारून दमदार विजयी सलामी देण्यासाठी सिंधू उत्सुक आहे. यासह तिला चांगली सुरुवात करता येईल.
श्रीकांत-वेई फेंग समोरासमोर
भारताचा के. श्रीकांत आणि यजमान मलेशियाचा युवा खेळाडू वेई फेंग चोंग हे स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत समोरासमोर असतील. यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. तसेच भारताच्या अजय जयरामला सलामी सामन्यात जपानच्या ताकुमा उइदाविरुद्ध खेळावे लागेल.