पेनांग - पी. व्ही. सिंधू, के. श्रीकांत या भारतीय शटलर्सने १ लाख २० हजार डॉलर्स पुरस्कार रकमेच्या मलेशिया मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक दिली.
सिंधू, श्रीकांत, अजय जयराम, सुभांकर दे, बी. साई प्रनिथ आणि समीर वर्माने एकेरीच्या पहिल्या लढतीत प्रतिस्पर्ध्यांना सहज पराभूत केले. दुहेरीत ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीनेही महिला दुहेरीची दुसरी फेरी गाठली.
प्रीमियर बॅडमिंटन लीगला दोन आठवडे उलटत नाही, तर मोसमातील पहिल्या ग्रँड प्रिक्स गोल्ड स्पर्धेत मोठ्या संख्येत अग्रणी भारतीय बॅडमिंटनपटू सहभागी झाले आहेत. तिसऱ्या सीडेड सिंधूने स्वित्झर्लंडच्या सॅब्रिना जॅकेटला ३३ मिनिटात २१-१७, २१-१६ ने नमवले, तर २०१४च्या चायना ओपन विजेत्या श्रीकांतने मलेशियाच्या वेई फेंग चोंगवर २१-१७, २१-११ ने मात केली. १० व्या सीडेड अजय जयरामने जपानच्या ताकुमा उएदाला २१-१९, २१-११ ने मात देऊन स्पर्धेबाहेर केले. टाटा ओपनचा विजेता समीरने जपानच्या १२ व्या सीडेड शो सासाकीचा अन्य एका पुरुष एकेरीच्या लढतीत २१-१८, २१-१८ ने फज्जा उडवला.
साई प्रणीतने मलेशियाच्या शाहजान शह मिसफहुलला २१-१३, २१-१५ ने नमवले. नवोदित खेळाडू सुभांकर देने थायलंडच्या कांताफोन वांगचारोएनला २१-१९, २१-१६ ने दणका दिला.
२०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेत्या ज्वाला-अश्विनी जोडीने दमदार खेळाचे प्रदर्शन करताना मलेशियाच्या मेई कुआन चोव आणि ली मेंग यिआनला ५४ मिनिटांच्या संघर्षानंतर २१-१४, १४-२१, २५-२३ ने नमवले.