आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या ७७ शाळांचा भार ६ क्रीडा शिक्षकांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणार्‍या महानगरपालिकेच्या शाळेतील खेळाडूंकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने खेळाडू घडवण्यात मनपाचे क्रीडा शिक्षक व विभाग नापास ठरला आहे. शहरात मनपाच्या एकूण ७७ शाळा असून क्रीडा शिक्षक मात्र ६ आहेत. अपुर्‍या क्रीडा शिक्षकांमुळे मनपा खेळाडूंची दयनीय अवस्था झाली आहे. जे क्रीडा शिक्षक आहेत त्यांची गेल्या पाच वर्षांतील कामगिरी शून्य असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मनपाच्या ७७ शाळांपैकी केवळ १७ शाळांना खेळण्याजोगी लहान-मोठी मैदाने सध्या उपलब्ध आहेत. मनपा प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून उभे केलेले स्टेडियम, क्रीडा सभागृहे, क्रीडा संकुलाच्या सुविधापांसून मनपाचे खेळाडूच अद्याप दूर आहेत. एकाही क्रीडा शिक्षकाने शाळेजवळील सुविधांचा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी लाभ घेतला नाही. बन्सीलालनगर येथील केंद्रीय शाळेत लाखो रुपये खर्च करून स्केटिंग, बास्केटबॉल मैदान उभारले असून आश्चर्याची बाब म्हणजे येथे अद्याप क्रीडा शिक्षकच देण्यात आलेला नाही.

प्रशासनाची तत्परता आवश्यक
मनपाचे विद्यार्थी गरीब असल्याने स्पर्धेला जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो. अनेक दिवस अधिकार्‍यांच्या टेबलवर फाइल पडून राहत असल्याने प्रवास भाडे व भत्ता वेळेवर देण्यात प्रशासन कमी पडते.

अधिकारीदेखील जबाबदारीपासून दूर
मनपाचे प्रभारी क्रीडाधिकारी बाबासाहेब चव्हाण यांनी गेल्या ४ वर्षांत एकही खेळाडू तयार केला नाही. विशेष म्हणजे त्यांच्यासह नागेश्वरवाडी शाळेत अनुजा चितळे या क्रीडा शिक्षिका आहेत. एकाच शाळेत दोन क्रीडा शिक्षक असूनदेखील येथे खेळाडू घडत नसल्याची शोकांतीका आहे.

उमेश गायकवाडांची धडपड
एन ७ येथील शाळेवरील विषय शिक्षक उमेश गायकवाड यांनी गत दोन वर्षांत एकूण ६० विभागीय आणि राज्यस्तरीय खेळाडू तयार केले. मात्र, मनपाने त्यांची अद्याप दखल घेतली नाही.

क्रीडा संघटनांनी मदत करावी
मनपाकडे क्रीडा शिक्षक आणि पैशाचीही कमतरता आहे. अशा परिस्थितीत विविध खेळांच्या क्रीडा संघटनांनी मनपा शाळेतील खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी आम्हाला मदत करावी. क्रीडा साहित्य, मैदान उपलब्ध आम्ही करून देऊ. - त्र्यंबक तुपे, महापौर
बातम्या आणखी आहेत...