आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय क्रीडाधिका-यांमुळे नरसिंग यादवच्या कारकिर्दीचा बळी, 4 वर्षाची बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादवचे ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. - Divya Marathi
भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादवचे ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.
रिओ - भारतीय कुस्ती महासंघाचा हट्ट आणि आततायीपणा, वर भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) केलेला प्रतिष्ठेचा प्रश्न यामुळे नरसिंग यादवसारख्या होतकरू मल्लावर ४ वर्षे बंदीची नामुष्की ओढवली. ‘वाडा’ या आंतरराष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेने बंदी घातलेल्या उत्तेजकांचे सेवन केल्याचे निष्पन्न होऊनही ‘नाडा’कडून (राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्था) बळजबरी क्लीन चीट मिळवून नरसिंगला रिओपर्यंत आणण्यात कुस्ती महासंघ व आयओए यशस्वी ठरले. त्याची अॅथलेटिक्स व्हिलेजमध्येही राहण्याची व्यवस्था केली, त्याला अधिस्वीकृती दिली. मात्र, ज्याची भीती होती तेच घडले. वाडाने नरसिंगच्या क्लीन चिटवर आक्षेप घेतला आणि आता त्याच्यावर चार वर्षे बंदीच्या शिक्षेचे संकट ओढवले आहे. हे संकट भारतीय कुस्ती महासंघ, आयओए आणि नाडाच्या चुकीमुळे ओढवल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्याच पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर “दिव्य मराठी’ला सांगितली.

“नाडा’ने क्लीन चीट दिल्यानंतर त्याचा अहवाल २४ तासांच्या आता “वाडा’ला कळवणे गरजेचे होते. नाडाने तसे केले नाही. यामुळे रिओत ऐनवेळी वाडाने आक्षेप घेतला. नाडाने ही प्रक्रिया आधीच केली असती तर रिओत जाऊन जगासमोर नरसिंगप्रकरणी भारताचे हसे झाले नसते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. रशियन खेळाडूंना जशी मुभा दिली तशी कृपादृष्टी नरसिंगला मिळावी यासाठी आयओएचे प्रयत्न सुरू होते. मात्र, यातही त्यांना अपयश आले.

खुळा आत्मविश्वास
दोन दिवसांपूर्व ‘वाडा’ संघटनेने ‘नाडा’ या राष्ट्रीय संघटनेच्या निर्णयाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे (कॅस) दाद मागितली. नरसिंग यादवच्या स्पर्धेला सुरुवात होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना वाडाने दाद मागितल्यानंतरही भारतीय पदाधिकारी नरसिंग कुस्ती खेळणारच, अशा भ्रमात होते. त्यांनी माध्यमांशी खासगीत तसे सांगायला सुरुवात केली होती. ‘वाडा’च्या अधिकाऱ्यांचे आश्वासन मिळाले आहे, असेही सांगण्यास काहींनी कमतरता ठेवली नाही.

... मग पदाधिकारी गप्प
१८ ऑगस्टला क्रीडा लवादाकडे या प्रकरणाची प्रदीर्घ सुनावणी सुरू होती तेव्हा आयओए व कुस्ती महासंघाचे अधिकारी नरसिंग खेळणारच म्हणून निश्चिंत होते. नरसिंगचे ड्रॉमध्ये नाव आले, त्याचे वजनही झाले आहे, असे सांगत अधिकारी भारतीयांना दिलासा देत होते. मात्र, प्रदीर्घ चर्चेअंती लवादाने ‘वाडा’चा आक्षेप ग्राह्य मानून नरसिंगवर ४ वर्षांची बंदी घातली तेव्हा हे पदाधिकारी गप्प बसले. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग व आयओए यांनी भारतात ‘नाडा’ या संस्थेला गुंडाळले खरे, परंतु आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघ, वाडा आणि लवाद यांना गुंडाळणे शक्य नसल्याचे त्यांना उशिरा कळले. तोपर्यंत नरसिंग यादवसारख्या होतकरू गुणवत्तेचा बळी गेला होता.

अवधी घेता आला असता
नरसिंग प्रकरणात वाडाच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी घेता आला असता. त्यामुळे त्याच्यावरील ४ वर्षांची बंदीही टाळता आली असती. मात्र ऑलिम्पिक खेळण्याची संधी साधता आली नसती. नाहीतरी ऑलिम्पिक ४ वर्षांनीच होणार म्हणून आम्ही धोका पत्करून सुनावणी करायला लावली, असेही ब्रिजभूषण यांनी सांगितले.

सीबीआय चौकशीची मागणी करू : ब्रिजभूषण
नरसिंगवरील बंदीबाबत प्रतिक्रिया देताना भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण म्हणाले, या प्रकरणात दोषीला शोधून काढण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत. एखाद्या खेळाडूची कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना धडा शिकवण्याची गरज आहे. असेही ते म्हणाले. कॅसच्या निर्णयामुळे नरसिंगला आता क्रीडाग्राम सोडावे लागणार आहे.

षड‌्यंत्र सिद्ध करण्यात अपयश
क्रीडा लवादाने वाडाचे अपील ग्राह्य धरताना नरसिंगवर डोपिंग प्रकरणी चार वर्षे बंदी घातली. तो ऑलिम्पिकला मुकला. त्याच्याविरुद्ध हे षड‌्यंत्र होते, परंतु भारतीय अधिकाऱ्यांना सिद्ध करता आले नाही, असे सूत्रांनी सांगितले.
पुढे वाचा, कॅसने दिलेले पत्र जसेच्या तसे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...