आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्‍ट्रेलियन ओपन टेनिस: मारिया शारापोवा, रॉजर फेडरर विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - माजी चॅम्पियन मारिया शारापोवा, सेरेना विल्यम्स आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या रॉजर फेडररने ऑस्‍ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील आपली विजयी लय अबाधित ठेवली. यासह त्यांनी आपापल्या गटाची चौथी फेरी गाठली.

रशियन टेनिसपटू मारिया शारापोवाने महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत लॉरेन डेव्हिसचा पराभव केला. तिने ६-१, ६-७, ६-० अशा फरकाने विजय संपादन केला. यासह तिला चौथ्‍या फेरीत प्रवेश करता आला. मात्र, यासाठी तिला अमेरिकेच्या डेव्हिसने तीन सेटपर्यंत झुंजवले. ट्रायबेकरपर्यंत रंगलेल्या दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारून डेव्हिसने लढतीत बरोबरी साधली होती. मात्र, त्यानंतर आक्रमक खेळी करताना शारापोवाने तिसऱ्या सेटमध्ये डेव्हिसला प्रत्युत्तराची एकही संधी मिळू दिली नाही. त्यामुळे तिला ६-० ने तिसरा सेट आपल्‍या नावे करताना सामना जिंकता आला. शारापोवाचा टूरमधील हा ६०० वा विजय ठरला. तिला यंदाच्‍या सत्रातील या स्पर्धेचा पुन्हा किताब आपल्या नावे करण्याची आशा आहे. आता चौथ्‍या फेरीतील तिचा सामना स्विसच्या बेलिंडा बेनसिसशी होणार आहे.
बेनसिसने तिसऱ्या फेरीत कातेरिनावर मात केली. तिने ४-६, ६-२, ६-४ अशा फरकाने विजयाची नोंद केली. त्यामुळे तिला सहजपणे चौथ्‍या फेरीत प्रवेश करता आला. मात्र, आता तिला शारापोवाच्या तगड्या आव्‍हानाला सामोरे जावे लागेल.
सेरेनाची डारियावर मात
जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सने महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत रशियाच्या १८ वर्षीय डारियावर मात केली. तिने ६-१, ६-१ अशा फरकाने विजय संपादन केला. सेरेनाने आक्रमक खेळी करताना अवघ्या २४ विनर्समध्ये सामना आपल्या नावे केला. अवघ्या ४४ मिनिटांत रशियाच्या युवा खेळाडूला पॅकअप करावे लागले. मात्र, तिने रंगतदार खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. करिअरमध्ये २२ व्या ग्रँडस्लॅम किताबासाठी उत्सुक असलेल्या सेरेनाचा चौथ्या फेरीतील सामना रशियाच्या मार्गारिटा गॅस्परयानशी होणार आहे.
फेडररचा ३०० वा विजय
स्विसच्या फेडररने ग्रँडस्लॅममध्ये ३०० व्या विजयाची नोंद केली. त्याने आतापर्यंत १७ ग्रँडस्लॅम किताब पटकावले आहेत. शुक्रवारी त्याने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत ग्रिगोर दिमित्रोवचा पराभव केला. त्याने ६-४, ३-६, ६-१, ६-४ ने विजयाची नोंद केली. यासाठी त्याला दिमित्रोवने चार सेटपर्यंत झुंजवले. मात्र, सरस खेळी करून त्याने हा विजय साकारला. याशिवाय त्याला ३०० वा विजय आपल्या नावे करता आला. आता त्याचा चौथ्‍या फेरीतील सामना बेल्जियमचा युवा खेळाडू डेव्हिड गोफिनशी होणार आहे.

केई निशिकोरी चौथ्या फेरीत
जपानच्या केई निशिकोरीने तिसऱ्या फेरीत रोमहर्षक विजय मिळवला. त्याने स्पेनच्या गुइलेर्मो गार्सिया लोपेजवर मात केली. त्याने ७-५, २-६, ६-३, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला.
बोपन्ना विजयी, भूपती बाहेर
भारताच्या रोहन बोपन्नाने रोमानियाच्या फ्लोरिन मर्जियासोबत पुरुष दुहेरीची तिसरी फेरी गाठली. या जोडीने लुकास-जिरीचा ६-३, ६-२ ने पराभव केला. दुसरीकडे महेश भुपती आणि जाइल्स मुलरला ब्रायन बंधुंनी पराभूत केले.