आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाला फुटबॉलपासून दूर करण्यासाठी शेतकरी पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न, त्याच मुलाने फेडले पित्याचे कर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- २१ वर्षीय सेंचोग ग्यालेस्टेन आज भूतानचा सर्वाधिक यशस्वी फुटबॉलपटू आहे. तो आपल्या देशासह भारत, बांगलादेश आणि म्यानमारच्या िवविध क्लबकडून खेळतो. त्याचा खेळाडू बनण्याचा प्रवास संघर्षपूर्ण राहिला. सेंचोगचे वडील नोब शेयरिंग हेच त्याचे सर्वात मोठे विरोधक होते. सेंचोगने ‘भास्कर’ला बोलताना म्हटले की, त्यांनी मुलाला फुटबॉलपासून दूर करण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्नदेखील केला होता.  


सेंचोग २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या फुटबॉल आय लीगच्या मिनर्व्हा एफसीकडून खेळतो. आपल्या खेळातील प्रवासाबाबत सेंचोगने सांगितले की, माझे वडील शेतकरी आहेत. ते भाज्यांची शेती करतात. मला लहानपणापासून फुटबॉलचे वेड होते. वडिलांची इच्छा होती की, मी त्यांच्यासोबत काम करावे. कारण त्यांच्यावरील कर्जांचा डोंगर वाढत होता. मी शेतात कपड्यांचा फुटबॉल बनवून खेळत असे. माझा उत्साह पाहून वडिलांनी अनेक वेळा फुटबॉल जाळून टाकला. मला १२ वर्षांखालील संघ निवड चाचणीची माहिती मिळाली. मी चाचणीला जाण्याचे निश्चित केले. ही बाब वडिलांना माहिती झाल्यावर त्यांनी मला रोखण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला. देवाची कृपा ते यातून वाचले. त्यानंतरही सेंचोग १२, १४, १६, १८ आणि १९ वर्षांखालील गटात वडिलांना न सांगता खेळत राहिला. यातून जो पैसा मिळत होता तो जमा करत गेला. जेव्हा २०१४ मध्ये थायलंडच्या ब्युरेन क्लबसोबत करार केल्यावर त्याच्या वडिलांना माहिती झाले. सेंचोगने सांगितले की, जेव्हा वडिलांना माहिती झाले तेव्हा मी माझ्याजवळील सर्व बचत त्यांना दिली. वडिलांचे डोळे पाणावले. त्यानंतर त्यांनी माझ्या खेळाला कधीच विरोध केला नाही. आम्ही आमच्या बचतीतून सर्व कर्ज फेडून टाकले. 


भूतानसाठी केले सर्वाधिक १० गोल
सेंचोगने २७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून १० गोल केले आहेत. तो आपल्या देशासाठी सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू आहे. १२ ते १९ वर्षांखालील स्पर्धेदरम्यान त्याच्या नावे २०० गोल आहेत.त्याच्यातील गोलची क्षमता पाहून त्याला रोनाल्डो नावाने बोलावले जाते. माझे मित्र मला रोनाल्डो म्हणून संबोधतात. याच कारणामुळे वडिलांना अनेक वर्षांपासून मी खेळत असल्याचे कळाले नाही. रोनाल्डोच त्याचा आदर्श आहे. आता स्वत:च्याच नावाने त्याची ओळख निर्माण व्हावी असे सेंचोगला वाटते.

बातम्या आणखी आहेत...