आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेनकडून पराभूत झाल्याने जयराम उपविजेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामन्यादरम्यान शॉट खेळताना जयराम,  चेन. - Divya Marathi
सामन्यादरम्यान शॉट खेळताना जयराम, चेन.
सेऊल- भारताचा युवा तडफदार खेळाडू अजय जयरामचे कोरिया ओपनमध्ये "अजेय' राहण्याचे स्वप्न भंगले. फायनलमध्ये त्याचा जगातला नंबर वन खेळाडू चीनच्या चेन लाँगकडून पराभव झाला. यामुळे जयरामला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ६,००,००० अमेरिकन डॉलर बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धेच्या फायनलमध्ये चेन लाँगनेच बाजी मारली.
अजय जयरामने स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने पहिल्यांदा सुपर सिरीजच्या फायनलमध्ये धडक देण्याचा पराक्रम केला. फायनलपूर्वी जगातला नंबर ६ चा खेळाडू डेन व्हिक्टर अॅलेक्सन, जानचा शो ससाकी आणि चीन तैपेईचा सातव्या क्रमांकाचा खेळाडू चोऊन तेन चेनला पराभूत करून फायनल प्रवेश केला होता. फायनलमध्ये तो चेन लाँगला आव्हान देईल, असे वाटत होते. मात्र, त्याला यश मिळाले नाही. जयरामला चीनची भिंत ओलांडता आली नाही. चीनच्या चेन लाँगने त्याला १४-२१, १३-२१ ने पराभूत करून स्पर्धेबाहेर केले. चीनच्या खेळाडूने ही झुंज अवघ्या ४० मिनिटांत जिंकली.
बंगळुरू येथे टॉम जॉन यांच्याकडून खास प्रशिक्षण घेणाऱ्या जयरामला फायनलमध्ये आपला फॉर्म टिकवता आला नाही. त्याने ज्या जोमाने स्पर्धेत खेळ केला, तसा खेळ तो फायनलमध्ये करू शकला नाही. जयरामने जोरदार स्मॅश मारून फायनलमध्ये सुरुवात केली. मात्र, चेनने त्याला तोडीस तोड उत्तर देऊन जेरीस आणले. चेनने १८-१३ अशी आघाडी घेतल्यानंतर २१-१४ ने पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्येही चेनच वरचढ
दुसऱ्या गेममध्ये फार बदल झाला नाही. पहिल्या गेमची पुनरावृत्तीच घडली. जयरामला चेनचे उत्तर मिळाले नाही. चेनने सुरुवातीपासून कोर्टवर चपळ खेळताना जोरदार स्मॅश मारून गुण मिळवले. चेन लाँगचा इतक्या गतीने खेळत होता की त्याने झटपट २०-१२ अशी आघाडी घेऊन विजय निश्चित केला. अपेक्षेनुसार त्याने दुसरा गेम २१-१३ ने जिंकून सामनाही आपल्या नावे केला.