आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयराम फायनलमध्ये, चीनच्या चेन लाँगविरुद्ध झुंज रंगणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - भारताचा युवा बॅडमिंटनपटू अजय जयरामची धडाकेबाज मोहीम सुरूच आहे. शनिवारी त्याने जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या चीन-तैपेईच्या चोऊ तिन चेनला पराभूत करून धक्कादायक विजय मिळवला. या दमदार विजयासह अजय जयरामने ६,००,००० अमेरिकन डॉलर बक्षीस रक्कम असलेल्या कोरिया ओपन बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली. त्याच्या कामगिरीमुळे भारताचे एक पदक निश्चित झाले आहे.

गेले काही दिवस जबरदस्त प्रदर्शनाने चर्चेत असलेला भारताचा युवा बॅडमिंटनपटू अजय जयरामने तमाम भारतीयांची छाती अभिमानाने फुगावी अशी स्तुत्य कामगिरी केली. मूळ बंगळुरूचा असलेला जयराम स्पर्धेत अद्याप "अजेय' आहे. २७ वर्षीय जयरामने आपल्यापेक्षा अधिक मानांकित खेळाडू चोऊ तिन चेनला २१-१९, २१-१५ असे पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला. भारताच्या खेळाडूने अवघ्या ४३ मिनिटांत सेमीफायनलची झुंज जिंकली. आता फायनलमध्ये जयरामचा सामना वर्ल्ड नंबर वन चीनच्या चेन लाँगविरुद्ध होईल.

जयरामनेही यापूर्वी दोन वेळा चेनला हरवले आहे. यापूर्वी त्याने २०१३ च्या जपान आणि २०११ च्या थायलंड ओपनमध्ये नमवले होते. मागचा अनुभव लक्षात ठेवून सेमीफायनलमध्ये जयरामने दमदार सुरुवात करताना सामन्यात ११-८ ने अाघाडी घेतली. यानंतर चीन-तैवानच्या खेळाडूने सलग सात गुण मिळवून सामन्यात रंगत आणली. मात्र, भारताच्या खेळाडूने मैदानावर अधिक चपळ आणि वेगवान खेळ करून पहिला गेम २१-१९ ने जिंकत सामन्यात १-० ने आघाडी घेतली.
जयरामने गाजवले मैदान
पहिला गेम जिंकल्यानंतर जयरामचा आत्मविश्वास वाढला. वाढलेल्या आत्मविश्वासासह त्याने दुसऱ्या गेममध्ये अत्यंत आक्रमक खेळ करताना विरोधी खेळाडूला डोके वर काढण्याची अधिक संधी दिली नाही. एकवेळ दोघे १५-१४ असे झुंज देत होते. मात्र, यानंतर जयरामने २१-१५ ने गेम आणि सामना जिंकला.
सुसाट अजय जयराम
या सत्रात अजय जयरामने दमदार प्रदर्शन करताना प्रत्येक स्पर्धेत छाप सोडली. या वेळी त्याने मलेशिया मास्टर्स ग्रँडप्रिक्स गोल्ड स्पर्धा, स्विस ओपन ग्रँडप्रिक्स आणि रशियन ओपन ग्रँडप्रिक्सच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली होती. मात्र, त्याला फायनल जिंकता आले नाही. आता कोरिया ओपनमध्ये जयरामकडे विजेतेपद जिंकण्याची संधी असेल. या वर्षी किदाम्बी श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनी इंडियन सुपर सिरीजचे पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद जिंकले होते.
अविस्मरणीय विजय..
हा विजय माझ्यासाठी मौल्यवान आहे. या विजयाने मी आनंदित आहे. मात्र, मोठे आव्हान तर आता फायनलमध्ये आहे. या अविस्मरणीय सामन्यातून प्रेरणा घेऊन मी फायनलमध्ये खेळेन.
अजय जयराम, विजयानंतर.