आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य हॉकी संघटनेच्या गैरव्यवहारांची चौकशी करा! आजी-माजी हॉकीपटूंची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र हॉकी असोसिएशन लिमिटेडच्या नावाने राज्यात सुरू असलेला हॉकी या खेळाचा धंदा ताबडतोब थांबवावा आणि त्यांच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी व ते शोधून काढण्यासाठी सत्यशोधन समिती राज्य सरकारने तत्काळ स्थापन करावी, अशी एकमुखी मागणी शनिवारी मुंबईत भारताच्या आजी-माजी,ऑलिम्पिकपटू, अर्जुन पुरस्कार विजेत्या व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी केली.
एमएचए लिमिटेड ही संस्था आपल्या कुटुंबीयांची जहागीर असल्यासारखी वापरत दिलबाग व त्यांचा मुलगा मंघालिंग बक्षी यांनी १५ वर्षे खुर्ची सोडली नाही. हॉकी या खेळासाठी काहीही न करता किंवा हॉकीपटूंना सदस्यत्व न देता संघटनेवर विद्यमान अध्यक्षांनी, बहुमताचा गैरवापर करून आपले नातेवाईक, इस्टेट एजंट्स, सुना, जावई, एवढेच नव्हे तर ड्रायव्हर्सनाही संघटनेचे सदस्यत्व दिले आहे, असा आरोप या हॉकीपटूंनी केला आहे. बक्षी आणि मंडळींनी हॉकी संघटना ही आपली वैयक्तिक कंपनी बनवली असून स्वत:च सदस्य नोंदवून बहुमताच्या जोरावर अनेक गैरव्यवहार करीत आहेत. राज्य सरकारने हॉकी संघटनेला, जमीन व अनुदान दिले आहे. त्यामुळे गैरव्यवहार शोधून दोषींना शासन करण्याची जबाबदारी राज्य शासनाचीही आहे, असे या हॉकीपटूंचे म्हणणे आहे.

...तर पुरस्कार परत
अशा परिस्थितीत संघटनेच्या नावावर होत असलेला गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्यासाठी सरकारने सत्यशोधन समिती स्थापन केली नाही, तर राज्य शासनाचे सारे पुरस्कार परत करण्याचा निर्वाणीचा इशाराही हॉकीपटूंनी दिला आहे. तसे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री विनोद तावडे आणि मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना दिले आहे.

आजी-माजी खेळाडू मैदानात उतरले
आवाहन करणाऱ्यांमध्ये १९६८च्या ऑलिम्पिकचे कांस्यपदक विजेते गुरुबक्षसिंग, तिहेरी ऑलिम्पियन मर्विन फर्नांडिस, पंच सनिंदर वालिया, अर्जुन पुरस्कार विजेते जोकिम कार्व्हाल्लो, ऑलिम्पियन गॅव्हिन फरेरा, नीना राणे, शिवछत्रपती पुरस्कारविजेता रमेश पिल्ले, राजू बगाडे, हरविंदर चिमा व राष्ट्रीय पंच रणजित दळवी, सुखबीरसिंग, पीटर मेनेंझिझ आदींचा समावेश आहे.

एमओएला विनंती
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनाही हॉकीपटूंनी हॉकी संघटनेच्या गैरव्यवहारांकडे लक्ष देण्याची विनंती केली असून कारवाई करा, असे कळवळीचे आवाहन केले आहे.