उस्मानाबाद - काळजाचा ठोका चुकविणाऱ्या अटीतटीच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या खो-खो संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. २७ व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिला आणि पुरुषांचा महाराष्ट्र संघांनी विजयी हॅट्रिक नाेंदवली. महिलांनी कर्नाटक, तर पुरुषाच्या संघाने कोल्हापूरला अंतिम सामन्यात मात देत अजिंक्यपद पटकावले. दुसऱ्या स्थानावर कर्नाटक, तिसऱ्या स्थानी महिलांचा कर्नाटक आणि केरळ, तर पुरुष संघात तेलंगणा, कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आणि कोल्हापूरचा संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. सर्वोत्कृष्ट क्रीडापटूचा बहुमान महाराष्ट्राच्या प्रियंका भोपी, उत्कृष्ट संरक्षक क्रीडापटूचा सन्मान कर्नाटकच्या विना एम. यांना, तर आक्रमक क्रीडापटू म्हणून महाराष्ट्रच्या काजल भोर हिला मान्यवरांच्या हस्ते चषक आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
अंतिम सामन्यात महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक महिलांच्या संघात रंगतदार लढत झाली. महाराष्ट्राने तीन गुणांच्या फरकाने कर्नाटकला धूळ चारली. श्रुती सपकाळने एक, काजल भोरने चार तर मृणाल कांबळेने तीन गडी बाद करून महाराष्ट्राला अकरा गुण मिळवून दिले. अखेरीस महाराष्ट्राच्या प्रबळ संघाने कर्नाटकाचा तीन गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राने कोल्हापूरवर पाच गुणांनी मात करीत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम ठेवले. महेश शिंदे, अक्षय गणपुले आणि दीपेश मोरे यांनी सरस खेळी केली.