आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिक स्वप्नपूर्तीसाठी हवे प्रशिक्षणाचे पाठबळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद  - स्टिपल चेस प्रकारामध्ये २०२० चे टोकियो ऑलिम्पिक माझ्यासाठी दूर नाही. सध्या स्टिपल चेसमध्ये माझी १०.२८ सेकंदांचा वेळ असून आॅलिम्पिकसाठी ९.४५ सेकंदांची पात्रता आहे. पोलिस दलाने विशेष तयारी करून घेतली तर मी नक्की पुढील ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास वर्ल्ड पोलिस गेम्समध्ये ३ सुवर्ण पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या जयश्री बोरगे हिने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.  

माझ्याकडून ऑलिम्पिकसाठी विशेष तयारी करून घेण्याची गरज आहे. इतर खेळाडूंकडे संघटना, क्रीडामंत्रालय विशेष लक्ष देते. त्या पद्धतीने मलादेखील विदेशात प्रशिक्षण, आर्थिक मदत, विशेष आहार आणि साहित्य उपलब्ध करून द्यायला हवे. विशेष प्रशिक्षण दिल्यास मी देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकू शकते, असेही जयश्रीने म्हटले. 
 
प्रत्येक खेळाडूंसाठी हवा विशेष कार्यक्रम  
पोलिस दलात मुंबईस्थित एमएसपीमध्ये पोलिस खेळाडूंकडून चांगला सराव करून घेतला जातो. राज्यात सर्व जिल्ह्यांत खेळाडू आहेत. त्यांना सरावासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने ते कमी पडतात. खेळाडूंचे आयुष्य कमी असते. त्यामुळे तीन-चार वर्षांसाठी खेळाडूंना कोणतेही काम न देता केवळ खेळावर लक्ष्य केंद्रित करू द्यायला हवे. त्यांना सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. पोलिस खेळाडंूसाठी विशेष कार्यक्रम आखल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी नक्की पदके जिंकतील, असे जयश्री म्हणाली.