आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वाला मिळाले जिल्हा प्रशासनाचे पाठबळ, महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी शहरातील एकमेव खेळाडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दक्षिणकोरियातील सेऊल शहरात ते सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या युथ स्पोर्टस फेस्टा २०१५ साठी मुलींच्या तीन सदस्यीय भारतीय संघात ६० मीटर प्रकारामध्ये स्थान पटकावणारी अमरावतीची धनुर्धर पूर्वा पल्लीवालच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. समर्थ धनुर्विद्या अकादमीची खेळाडू असलेल्या पूर्वाला जिल्हाधिकारी कार्यालयाने शुक्रवारी आर्थिक मदतीची हमी दिली . पूर्वा शनिवार २२ ऑगस्ट रोजी सरावासाठी दिल्लीकडे प्रस्थान करणार असल्याने जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कार्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वापरता येईल असे अॅरो तिला त्वरित उपलब्ध करून दिला आहे.यामुळे पुन्हा एकदा जिल्हा प्रशासन खेळाडूंच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचा प्रत्यय आला आहे. सेऊल येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारी पूर्वा ही अमरावती येथील एकमेव धनुर्धर असल्याचा सार्थ अभिमान असल्याची भावना प्रशासनाने व्यक्त केली आहे. पूर्वा समर्थ क्रीडा अकादमीत प्रशिक्षक गणेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनात गेल्या अनेक वर्षांपासून सराव करते. त्यांच्याच हाताखाली तिने धनुर्विद्येचे कौशल्य मिळवले आहे.

प्रोत्साहन मिळाले
सर्वसाधारणघरातील खेळाडू असल्यामुळे तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होताना कोणतीही अडचण भासू नये म्हणून डीएसओंनी लगेच अॅरो उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. तिला अॅरोची आवश्यकता होती. याआधीही अमरावती जिल्हा प्रशासनाने अनेक गरजू खेळाडूंना मदत केल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता आले. त्यामुळे उदयोन्मुख खेळाडूंनाही धीर आला असून त्यांनाही प्रोत्साहन मिळाले आहे.

एकाच वर्षात दोन धनुर्धरांची विदेशवारी
अमरावतीही धनुर्विद्या नगरी म्हणून सध्या राज्यात अन् देशातही नावारूपाला येत आहे. यासाठी राज्य धनुर्विद्या संघटना आणि येथील धनुर्विद्या अकादमीतील प्रशिक्षकांना श्रेय द्यावे लागेल. त्यांनी अगदी परिश्रमपूर्वक खेळाडू निर्माण केले. यंदा तुषार शेळके जागतिक विद्यापीठ स्पर्धेत सहभागी झाला होता. आता पूर्वाला जागतिक युवा क्रीडा महोत्सावात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी हवी बॅग
धनुर्विद्याया खेळाचे साहित्य ठेवण्यासाठी प्रवासात मजबूत बॅगची आवश्यकता असते. महागडे साहित्य सुरक्षित राहण्यासाठी या बॅगचा आधार असतो. तिच्याकडे ही बॅग उपलब्ध नसल्यामुळे तिने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शुक्रवारी आर्थिक मदतीसाठी अर्ज केला. त्यावेळी तिला मदत केली जाईल अशी हमी देण्यात आली.