औरंगाबाद - भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) मैदानावर सुरू झालेल्या हॉकी स्पर्धेत अमरावती, रेल्वे पोलिस, नागपूर विभाग आणि नाशिक विभागाने विजयी सलामी दिली. यजमान औरंगाबादला रेल्वे परिक्षेत्राने २-१ गोलने पराभवाची धूळ चारली. रेल्वे संघाच्या संशयास्पद गोलवरून थोडा वाद वगळता सामने शांततेत पार पडले. रेल्वे संघाने यजमानांविरुद्ध गोल केला होता, मात्र तो पंचांनी फेटाळला होता. यावरून वादाला सुरुवात झाली. मात्र, पंचांनी तातडीने त्या वादावर तोडगा काढून स्पर्धा सुरळीत केल्या. या सामन्यात यजमान संघाचा पराभव झाला.
पहिल्या सामन्यात अमरावतीने प्रशिक्षण संचालनालयावर २-१ गोलने मात केली. दुसऱ्या लढतीत नागपूर विभाग आणि मुंबई शहर यांच्यातील मुख्य लढत ०-० गोलने बरोबरीत सुटली. पेनल्टी शूटआऊटवर नागपूर विभागाने मुंबई शहरवर ५ गोलने शानदार विजय मिळवला. तिसऱ्या लढतीत नाशिक विभागाने कोकण विभागावर ६-१ गोलने एकतर्फी पराभव केला.
कबड्डीतील यजमानांचे आव्हान संपुष्टात : साईच्या मैदानावर मॅटवर सुरू असलेल्या कबड्डीच्या स्पर्धेत यजमान औरंगाबादच्या महिला आणि पुरुष संघाचे आव्हान संपुष्टात आले. औरंगाबाद-नांदेड परिक्षेत्र संघाला कोकण विभागाने ५४-२५ गुणांनी पराभूत केले. यजमान औरंगाबाद पुरुष संघाला कोल्हापूर संघाने ३९-२४ गुणांनी हरवले.
फुटबॉल : नागपूर, अमरावतीची आगेकूच : पोलिस मुख्यालयाच्या देवगिरी मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेत नागपूर विभागाने मुंबई शहरावर रोमांचक सामन्यात ५-४ गोलने शानदार विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत अमरावती विभागाने नाशिक विभागावर २-१ गोलने मात केली. तिसऱ्या लढतीत कोल्हापूर विभागाने नागपूर विभागाचा १-० गोलने पराभव केला. चौथ्या सामन्यात सीआरपीएफने कोकणला ५-० गोलने एकतर्फी पराभूत केले.
बास्केटबॉल : औरंगाबाद, कोकणची आघाडी
विद्यापीठाच्या मैदानावर सुरू झालेल्या बास्केटबॉल स्पर्धेत महिला गटात औरंगाबाद-नांदेड विभागाने विजयी सलामी दिली. औरंगाबादने नागपूर विभागाला २०-१० गुणांनी मात दिली. औरंगाबादची राष्ट्रीय खेळाडू उज्ज्वला सलामपुरेने जबरदस्त कामगिरी करत सर्वाधिक १० गुणांची कमाई केली. प्राजक्ता देशपांडे व सुप्रिया गोनरोलेने उत्कृष्ट साथ दिली. यजमान खेळाडूंनी चपळ आणि वेगवान खेळाचे प्रदर्शन केेले. नागपूरकडून रोशनी भुरे, अर्चना दरक आणि वैशाली मुंबईकर यांचे प्रयत्न अपुरे पडले. दुसऱ्या लढतीत कोकणने मुंबईला १५-१३ ने हरवले. सुरुवातीपासून कोकण संघाने समान्यात आघाडी घेतली. विजेत्या संघाकडून स्वाती वाळुंजने सर्वाधिक ८ बास्केट गुण कमावले. भुवनेश्वरी बी., तृप्ती कालनघाटेकर व आम्रपाली बनसोडेने शानदार खेळ केला. मुंबईच्या प्रियंका निकम, वसुंधराने एकाकी झुंज दिली.
खो-खो : औरंगाबाद, नागपूरची आगेकूच
विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत यजमान औरंगाबाद-नांदेड संघाने विजयी सलामी दिली. पहिल्या लढतीत औरंगाबादने ठाणे शहर संघावर २ गुण आणि ६ मिनिटे राखून मात केली. औरंगाबादकडून तनुजा गोपालघरेने २.४० मि. व ३ मिनिटे संरक्षण केले, तर आक्रमणात ३ गडी मारले. उज्ज्वला देशमुखने १.३० मि. व १.३० मिनिटे संरक्षण केले आणि १ गडी मारला. अष्टपैलू जास्मिन मुजावरने ३.२० मि. व २.३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचे योगादान दिले. पराभूत संघाकडून पल्लवी शिंदेने २ मिनिटे संरक्षण, तर ४ गडी बाद करत एकाकी झुंज दिली. दुसऱ्या लढतीत रेल्वे पोलिस संघाने अमरावती विभागावर १ गुण व ३.३० मिनिटे राखून विजय मिळवला. तिसऱ्या लढतीत नागपूर विभागाने नाशिक विभागावर १ डाव आणि ११ गुणांनी विजय मिळवला.