आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा: औरंगाबादच्या कावेरी सुरासेला कांस्यपदक, संजना लहानेने रचला विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पर्धेच्या चौथ्या दिवशी वैयक्तिक मैदानी व कुस्ती स्पर्धेत मुंबई शहरच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. नागपूर आणि अमरावती संघाने व्हॉलीबॉलची फायनल गाठली. 
 
औरंगाबाद - साई येथे सुरू असलेल्या महिला कुस्ती स्पर्धेत यजमान औरंगाबाद-नांदेडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय खेळाडू कावेरी सुरासेने ५३ किलो वजन गटात कांस्यपदक आपल्या नावे केले. या गटात मुंबई शहरच्या रूपाली सावंतने सुवर्णपदकाची कमाई केली. कोकणच्या मोनिका कदमने रौप्यपदक मिळवले.  त्याचप्रमाणे स्वप्नाली जायभायने ६९ किलो गटात सुवर्ण पटकावले. गटात ठाणे शहरच्या अनुराधा अालटने रौप्य, तर कोल्हापूरच्या ज्योती कांबळेने कांस्यपदक मिळवले. ७५ किलो गटात नाशिकच्या सुनीता साबळेने सोने जिंकले. गटात मुंबई शहरच्या वर्षाराणी पाटीलने रौप्य आणि सुप्रिया जगदाळेने कांस्यपदक आपल्या खात्यात जमा केले.  
 
हॉकी : कोल्हापूर, पुणे अंतिम लढत   
साईच्या मैदानावर सुरू असलेल्या हॉकी स्पर्धेत पुरुष गटात विजेतेपदासाठी एसआरपीएफसमोर कोल्हापूरचे आव्हान असेल. पहिल्या उपांत्य फेरीत कोल्हापूरने रेल्वे पोलिसांना २-० गोलने एकतर्फी पराभूत केले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात एसआरपीएफने पुणे शहरावर ट्रायब्रेकरमध्ये ६-४ गोलने विजय मिळवत फायनल गाठली. एसआरपीएफच्या विजयात गाेलरक्षक कपिल भोजनेने सिंहाचा वाटा उचलला. मुख्य सामना २-० गोलने बरोबरीत सुटला. 
व्हॉलीबॉल : नागपूर-अमरावती झुंजणार :    
महिला गटात नागपूर व अमरावतीने अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या उपांत्य लढतीत नागपूरनेे मुंबईवर ३-१ सेटने विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमरावतीने पुण्यावर ३-१ सेटने मात केली. पुरुष गटात विजेतेपदासाठी मुंबईसमोर पुणे शहरचे आव्हान असेल. पहिल्या उपांत्य लढतीत  मुंबई शहरने रेल्वे पोलिसांवर ३-२ सेटने विजय मिळवला. पुणे शहराने नागपूरवर ३-१ सेटने मात केली. 
 
फुटबॉल : नागपूर विभागाला विजेतेपद  
पोलिस मुख्यालयाच्या देवगिरी मैदानावर झालेल्या फुटबॉलच्या अंतिम सामन्यात नागपूर संघाने विजेतेपद पटकावले. फायनलमध्ये नागपूर विभागाने कोल्हापूर विभागावर ४-३ गोलने पराभूत करत बाजी मारली. त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत राज्य राखीव पोलिस दलाने अमरावती संघावर ४-१ ने विजय मिळवत तिसरे स्थान पटकावले.
 
कबड्डी : कोल्हापूरविरुद्ध मुंबई फायनल रंगणार 
कबड्डी स्पर्धेत पुरुष व महिला गटात मुंबई शहरच्या संघांनी अंतिम फेरी गाठली. पुरुष गटात कोल्हापूर व महिला गटात कोकणने अंतिम फेरीत धडक मारली. पुरुषांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात कोल्हापूरने एसआरपीएफला ४७-३३ गुणांनी पराभूत केले. दुसऱ्या उपांत्य लढतीत मुंबई शहर संघाने कोकण विभागाला ३७-२२ गुणांनी मात दिली. महिला गटात उपांत्य लढतीत कोकण संघाने प्रशिक्षण संचालनालयावर ४२-२६ गुणांनी विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य लढतीत मुंबई शहरने नागपूरला २३-१९ गुणांनी नमवले.
 
संजना लहानेने रचला विक्रम 
महिला गटात ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत ठाणे शहरच्या संजना लहानेने अडथळे पार करत विक्रमी धाव घेतली. तिने गतवर्षीचा स्वत:चा ६७.०७ सेकंदांचा विक्रम मोडीत काढला. तिने ६५.०६ सेकंदांत सुवर्णपदक पटकावले. प्रशिक्षण संचलनालयाच्या शीतल भागवतने ६९.०८ सेकंदांत रौप्यपदक, तर राही नेमाने हिने ७३.०२ सेकंदांत कांस्यपदक मिळवले. पुरुष गटात एसआरपीएफच्या दयानंद यादवने ५६.०६ सेकंदात आपल्या पांडुरंग वाघमोडे ५८.०० से. या सहकाऱ्याला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. अॅथलेटिक्स : मंजिरी, अमोलची वेगवान धाव : २०० मीटर शर्यतीत प्रशिक्षण संचालनालयाच्या मंजिरी रेवाळेने २६.०८ सेकंदांत व पुरुष गटात मुंबईच्या अमोल लोखंडेने २२.०१ सेकंदांत सुवर्ण जिंकले.