सीआरपीएफने ३ सुवर्णपदके पटकावत आनंदोत्सव साजरा केला. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत आज सायं. ४ वा. भारत बटालियन येथे स्पर्धेचा समाराेप होणार
औरंगाबाद - विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या बास्केटबॉल स्पर्धेत महिला गटात अमरावतीने विजेतेपद पटकावले. अमरावतीने रेल्वे पोलिसांना ४०-३५ गुणांनी पराभूत केले. विजेत्या संघाकडून स्वप्निका गायकवाडने १३, तर रश्मी इंगळेने ११ गुणांची कमाई करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. रेल्वे संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मनावे लागले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या अत्यंत रोमांचक लढतीत नाशिकने नागपूरला १ गुणाने पराभूत केले. नाशिकने ४९, तर नागपूरने ४८ गुण मिळवले.
तिहेरी उडीत अमित पवार पहिल्या स्थानी
तिहेरी उडीत ठाण्याच्या अमित पवारने पहिला क्रमांक पटकावला. अमितने १३.६८ मीटर लांब उडी घेतली. प्रशिक्षण संचालनालयाच्या अमेय इंदुलकरने १३.६० मीटर लांब उडी घेत दुसरा क्रमांक, तर कोकणच्या निवृत्ती भोईरने १३.५९ मीटर लांब उडी मारत तिसरा क्रमांक मिळवला.
एसआरपीएफचे सचिन, अतुल, सुहास चमकले : ३ हजार मीटर शर्यतीत एसआरपीएफच्या सचिन गरोटेने १०.२१.०६ सेकंदात सुवर्ण, तर अतुल कडूने १०.४१.०३ सेकंदात रौप्य जिंकले. नाशिकच्या दशरथ पटेलने १०.५९.०८ सेकंदांत कांस्य राखले. भालाफेक : एसआरपीएफच्या सुहास बेनकेने ६३.२८ मीटर लांब भाला फेकून सुवर्ण तर कोल्हापूरच्या अर्जुन सिरोटेने (५८.८० मी) रौप्य मिळवले.
एसआरपीएफला हॉकीचे विजेतेपद
साईच्या मैदानावर बुधवारी झालेल्या हॉकीच्या अंतिम फेरीत राज्य राखीव पोलिस दलाच्या संघाने (एसआरपीएफ) विजेतेपद पटकावले. एसआरपीएफने कोल्हापूर संघावर ३-१ गोलने मात करत बाजी मारली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रेल्वे पोलिसांनी पुणे शहर संघावर टायब्रेकरमध्ये ६-५ ने विजय मिळवला.
फायनलमध्ये कोल्हापूरच्या संघांनी पहिला गोल करून चांगली सुरुवात केली. विनोद मनगुडेने ७ व्या मिनिटाला मैदानी गोल करत कोल्हापूरला १-० ने आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला एक मिनिट शिल्लक असताना संदेश मोरेने गोल करत एसआरपीएफला १-१ गोलने बरोबरीत आणून ठेवले. मध्यंतरानंतर एसआरपीएफच्या मोहसीन पठाणने ५७ व्या मिनिटाला शानदार गोल नोंदवत संघाला २-० ने आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात कोल्हापूरच्या खेळाडूंना संघर्ष करूनही चेंडूवर ताबा मिळवता आला नाही. अखेरच्या क्षणी राहुल महेकरने ६५ व्या मिनिटाला गोल करून संघाचा ३-० ने विजय निश्चित केला.
तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत सामन्याच्या सुरुवातीला पुण्याच्या कुणाल जगदाळेने पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामना संघर्षपूर्ण ठरला. मध्यंतरानंतर ६३ व्या मिनिटाला पवन बोराळेने गोलचे खाते उघडत सामना १-१ गोलने बरोबरीत आणून ठेवला. अखेर टायब्रेकरमध्ये रेल्वे पोलिसांच्या गोलरक्षक रमाकांत कारलेने पुण्याच्या विनोद निभोरचा उत्कृष्ट स्ट्रोक राेखत संघाला विजयी केले.
अधिकारी चालले ५ किमी
वरिष्ठ अधिकाऱ्यांची ५ किमी चालण्याची स्पर्धा पोलिस आयुक्तालय ते आयपी मेसपर्यंत घेण्यात आली. अकोल्याचे पाेलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सुवर्ण, तर आयआरबीचे समादेशक निसार तांबोळी यांनी राैप्य मिळवले. कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी कांस्य जिंकले. या स्पर्धेत पोलिस महासंचालक सतीश माथूर, अप्पर पोलिस महासंचालक प्रज्ञा सरवदे, पोलिस अायुक्त दत्ता पडसलगीकर, अमितेश कुमार यांनी सहभाग नोंदवला.
अॅथलेटिक्स : सोनिया मोकळचा विक्रम
८०० मीटर शर्यतीत मुंबई शहरच्या सोनिया मोकळने स्वत:चा २.२१.०३ सेकंदांचा विक्रम मोडीत काढला. तिने २.१०.०८ सेकंदांत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. कोल्हापूरच्या सोनाली देसाईने २.२०.०३ सेकंदांत रौप्य व श्रीदेवी म्हेत्रेने २.२४.०९ सेकंदांत कांस्य जिंकले. पुरुष गटात कोकणच्या नितीन पाटीलने २.०३.०८ सेकंदांत सुवर्ण धाव घेतली. त्याने कोल्हापूरच्या गजानन गायकवाडला (२.०४.०१ से.) मागे टाकले. नीलेश सूर्यवंशीने २.०५.०१ सेकंदांत कांस्यपदक मिळवले.