आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा: मुंबई शहरला सर्वसाधारण विजेतेपद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या २९ व्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेत मुंबई शहर संघाने पुरुष व महिला गटात सर्वसाधारण विजेतेपदक पटकावत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. महिला गटात कोल्हापूर परिक्षेत्र आणि पुरुष गटात राज्य राखीव पोलिस दलाच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. स्पर्धेत बिपिन ढवळे आणि जयश्री बोरगेने कोल्हापूरचा तडका दाखवून दिला, हे दोघे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले. प्रशिक्षण संचालनालयाच्या संघाने उत्कृष्ट संचालन व शिस्तीचा १० हजार रुपयांचा पुरस्कार पटकावला. सातारा येथील भारत बटालियन मैदानावर राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.   

मंजिरी वेव्हाळे वेगवान धावपटू   
महिलांच्या १०० मीटर शर्यतीत प्रशिक्षण संचालनालयाच्या मंजिरी वेव्हाळेने १२.०८ सेकंदांत सुवर्ण जिंकत वेगवान धावपटूचा मान मिळवला. मुंबईच्या स्वाती भिल्लारेने १३.०१ सेकंदांत रौप्यपदक, तर मुंबईच्याच माधुरी थिरमेने १३.०५ सेकंदांत कांस्यपदक पटकावले. पुरुष गटात ठाणे शहरच्या वैभव एडगेने १०.०७ सेकंदांत रौप्यपदक आणि मुंबई शहरच्या अमोल लोखंडेने १०.०९ सेकंदांत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. यजमान औरंगाबादचा अखिल पटेल अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमबाजी स्पर्धेत सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे सर्वोत्कृष्ट नेमबाज ठरले.
 
जयश्री, बिपिन सर्वोत्कृष्ट खेळाडू 
पुरुष गटात १०० मीटर शर्यतीत कोल्हापूरचा बिपिन ढवळने अमरावतीच्या सय्यदच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याने १०.६ सेकंदांत सुवर्णपदक जिंकत वेगवान धावपटू ठरला. त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा मान देखील मिळाला. त्याला मान्यवराच्या हस्ते मोटारसायकल भेट देण्यात आली. कोल्हापूरच्या जयश्री बोरगेने १५०० मीटर शर्यतीत नवा विक्रम रचला. तिला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. तिला राज्यपालांच्या हस्ते दुचाकीची चावी देऊन गौरवण्यात आले.  
 
औरंगाबाद परिक्षेत्र पुन्हा तळाशी    
गेल्या अनेक वर्षांपासून राज्य पोलिस स्पर्धेत औरंगाबाद परिक्षेत्र पदकतालिकेत तळाला राहत आहे. यंदा यजमानपद औरंगाबादकडे असल्याने औरंगाबाद-नांदेड संघ एकत्र करून पदके वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र औरंगाबादचा पुन्हा फ्लॉप शो ठरला. सांघिक गटात संघाला एकही पदक मिळाले नाही. दोन परिक्षेत्र एकत्र केल्याने अनेक खेळाडूंचे नुकसान झाले, त्यांना स्पर्धेत सहभागी होता आले नाही. औरंगाबादने वैयक्तिक गटात ३ सुवर्ण, १ रौप्य आणि ४ कांस्यपदके पटकावली. रेणुका देवणे, अखिल रुस्तम पटेल आणि नीलेश जाधवने सुवर्ण जिंकले. थाळीफेकमध्ये रेणुका देवणेने रौप्यपदक मिळवले. कुस्तीमध्ये कावेरी सुरासे व रूपाली राणे, २०० मीटर शर्यतीमध्ये ललिता साळवे आणि वेटलिफ्टिंमध्ये सरिता साखरेने कांस्यपदके मिळवली.
 
अंतिम निकाल 
-   सर्वसाधारण विजेतेपद (पुरुष गट) -  मुंबई शहर, राज्य राखीव पोलिस दल परिक्षेत्र,  कोल्हापूर परिक्षेत्र. महिला -  मुंबई शहर, कोल्हापूर परिक्षेत्र, प्रशिक्षण संचालनालय.  
- १५ मीटर ग्रुपिंग फायर - पीटीएस प्राचार्य दिलीप झाळके (२० गुण, नागपूर),  पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे (२०, सांगली), पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल (नाशिक), विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील (कोल्हापूर परिक्षेत्र), एसआरपीएफचे जीआर निखिल पिंगळे (एसआरपीएफ) २० गुण.  
- १५ मीटर अॅप्लिकेशन फायर -  पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे (५९ गुण, सांगली),  पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल (५७ गुण, नाशिक),  वि. पो. महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील (५७, कोल्हापूर).  
- १५ मीटर अॅप्लिकेशन फायर -  दत्ता शिंदे (५३ गुण, सांगली),  शामराव दिघावकर (५० गुण, एसआरपीएफ),  अपर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे (४९ गुण, सोलापूर ग्रामीण).  
-२५ मीटर २२ रायफल फायर महिला -  वंदना फुलारी (९३ गुण),  रोशिता कुमार (८८ गुण), रूपाली नागरे पाटील (८५ गुण).  
बातम्या आणखी आहेत...