आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका मायभूमीत बलाढ्य असल्याची जाणीव: कोहली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जागतिक क्रिकेटमधील स्वगृही अतिशय बलाढ्य मानले गेलेले क्रिकेट संघ आहेत, त्यापैकी श्रीलंका हा एक संघ आहे, याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे श्रीलंका संघाला कमी लेखून कसोटीतील पहिल्या क्रमांकावरचा संघ हे ‘लेबल’ बाजूला ठेवून खेळण्यासाठी आणि विजयी होण्यासाठी आलो आहोत, असे श्रीलंका भूमीवर पाय ठेवताक्षणी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने जाहीर केले.  

विराट पुढे म्हणाला, श्रीलंका भूमी आमच्यासाठी ‘व्हेरी स्पेशल’ आहे. कारण कसोटी क्रिकेटच्या अव्वल क्रमांकावर जाण्याचे आमचे अभियान येथेच दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. त्या वेळी आम्ही खालच्या क्रमांकावर होतो.  

दोन वर्षांपूर्वीचा श्रीलंकेचा संघ प्रथितयश खेळाडूंचा होता. संगकारा होता, रंगना हेराथ होता, धम्मिका प्रसाद होता, अँजेलो मॅथ्यूज होता. त्या वेळी सर्वांना सांगितले की, कोण किती खेळला, त्यापेक्षाही तुम्ही या क्षणी कसे खेळता, ते महत्त्वाचे आहे, असे कोहली म्हणाला.   

संघाच्या जडणघडणीच्या प्रक्रियेला काही महिने लागतात. मात्र, त्यानंतर मानसिकदृष्ट्या किती सक्षम बनला आहात, यावरच पुढील यश अवलंबून असते. गॉल कसोटीतील पराभव आमच्या मनाला फार लागला होता. त्यानंतरचे विजयही प्रखर झुंज दिल्यानंतरच मिळाले होते, असेही भारतीय कर्णधाराने नमूद केले.

अध्यक्षीय संघाविरुद्ध आजपासून सराव सामना  
श्रीलंकेच्या भूमीवर पोहोचलेल्या कोहली ब्रिगेडचा शुक्रवारी अध्यक्षीय संघाविरुद्ध सराव सामना आहे. कसोटी संघात परतलेला रोहित शर्मा आणि सलामीवीर लोकेश राहुल यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. राहुलच्या फिटनेसची पाहणी या सराव लढतीत होईल. मुरली विजयच्या जागी शिखर धवन भारतीय संघात सामील झाला आहे. त्याच्या कामगिरीकडेही लक्ष असेल.
बातम्या आणखी आहेत...