आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्बल्डन : 23 वर्षांत व्हीनस सर्वात वयस्कर ग्रँडस्लॅम महिला फायनलिस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पाच वेळेसची चॅम्पियन अमेरिकेची व्हीनस विल्यम्सन आणि स्पेनची गरबाईन मुगुरुजा यांच्यात विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिपचा महिला एकेरीची फायनल होणार आहे. मुगुरुजाने स्लोव्हाकियाच्या मॅगदालेना रिबारीकोवाला पहिल्या सेमीफायनलमध्ये एकतर्फी लढतीत ६-१, ६-१ ने मात दिली,तर ३७ वर्षीय व्हीनसने ब्रिटनच्या जोहाना कोंटाला दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सरळ सेटमध्ये ६-४, ६-२ ने हरवले. व्हीनस मागच्या २३ वर्षांत कोणत्याही ग्रँडस्लॅमच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये पोहोचणारी सर्वात वयस्कर खेळाडू ठरली. १९९४ मध्ये ३७ वर्षे ८ महिने वय असताना मार्टिना नवरातिलोवाने विम्बल्डनचे फायनल गाठले होते. व्हीनस मागच्या १७ जून रोजी ३७ वर्षांची झाली.  
 
मुगुरुजाने तीन वर्षांत दुसऱ्यांदा विम्बल्डनची फायनल गाठली. ती २०१५ मध्ये उपविजेती होती. १४ वी मानांकित मुगुरुजाने २७ वी मानांकित रिबारीकोवाचे आव्हान अवघ्या ६४ मिनिटांत मोडून काढले. रिबारीकोवा तिसरी मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा आणि अमेरिकेच्या वेंडेवेगला हरवत सेमीत पोहोचली होती. मुगुरुजाने २२ विनर्स मारले आणि आपल्या २५ गुणांपैकी १९ गुण नेटवर मिळवले. स्पेनच्या खेळाडूने आक्रमक सुरुवात करताना आधीच्या १० मिनिटांतच ३-० ने आघाडी घेतली होती. यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. 
 
दुसरीकडे व्हीनसने ४० वर्षांनंतर विम्बल्डनच्या फायनलमध्ये पोहोचणारी पहिली ब्रिटिश महिला बनण्याचे कोंटाचे स्वप्न भंग केले. १९७७ मध्ये  व्हर्जिनिया वेड या चॅम्पियनशिपच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये खेळणारी शेवटची ब्रिटिश महिला होती. व्हीनसने दहाव्या गेममध्ये कोंटाची सर्व्हिस मोडून पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये तिने दोन वेळा ब्रिटिश खेळाडूची सर्व्हिस मोडली. व्हीनस २००९ नंतर पहिल्यांदा विम्बल्डनच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. तिने ग्रँडस्लॅम जिंकले तर २००८ नंतर पहिल्यांदा ती कोणतेही ग्रँडस्लॅम किताब जिंकण्यात यशस्वी होईल. २००८ मध्ये तिने विम्बल्डनच्या रूपातच अखेरचे आणि दहावे ग्रँडस्लॅम जिंकले होते.
 
रोहन बोपन्ना क्वार्टर फायनलमध्ये; सानिया मिर्झाचे आव्हान संपुष्टात!
भारताचा दुहेरीतील अव्वल टेनिसपटू रोहन बोपन्नाने आपल्या जोडीदारासह वर्षाचे तिसरे ग्रँडस्लॅम विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झाला मात्र तिसऱ्या फेरीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. यासह तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मिश्र दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत बोपन्ना आणि कॅनडाची गॅब्रियल डाबरोवस्की या दहाव्या मानांकित जोडीने क्रोएशियाची जोडी निकोला मेकटिक आणि अॅना कोंजून यांना ७-६, ६-२ ने मात देत अंतिम आठमध्ये प्रवेश निश्चित केला.  सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इवान डोडिग यांना कोर्ट दोनवर झालेल्या सामन्यात फिनलंडचा हेन्री कोंटिनेन आणि इंग्लंडची हिथर वॉटसन यांनी ६-७, ४-६ ने मात दिली. 
बातम्या आणखी आहेत...