अौरंगाबाद - एंड्युरन्स एमएसएलटीए मराठवाडा टेनिस सेंटरतर्फे आयोजित २५ हजार डॉलर महिला आयटीएफ अजिंक्यपद स्पर्धेत फायनलमध्ये स्लोव्हाकियाच्या तादेजा मॅजेरिकने युक्रेनच्या वेलरिया स्त्रकोवाचा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. दुसरीकडे एकेरीतील पराभवामुळे वेलेरियाची दुहेरी विजेतेपदाची संधी हुकली.
विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या लढतीत रोमांचक लढतीत स्पर्धेतील द्वितीय मानांकित तादेजा मॅजेरिकने युक्रेनच्या अव्वल मानांकित वेलरिया स्त्रकोवाला १ तास ३५ मिनिटात पराभवाची धूळ चारली. मॅजेरिकने अपेक्षेप्रमाणे खेळ करत ६-४, ६-३ अशा दोन सेटमध्ये आपला विजय संपादित केला. पहिल्या सेटमध्ये संघर्ष करणाऱ्या वेलरियाला दुसऱ्या सेटमध्ये डोकेवर काढू दिले नाही. स्पर्धेतील विजेतीला २ लाख ५८ हजार रुपये बक्षीस आणि ५० डब्ल्यूटीए गुण मिळाले. उपविजेतीला १ लाख ३७ हजार रुपये बक्षीस, ३० डब्ल्यूटीए गुण देण्यात आले.
विजेत्या खेळाडूंना एंड्युरन्सचे बिस्वजित चौधरी, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, आयटीएफ निरीक्षक शीतल अय्यर, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी संजय दत्ता, मुख्य प्रशिक्षक अर्शद देसाई, शेषराव तुपे, गजेंद्र भोसले, प्रवीण गायसमुद्रे, हर्षल शर्मा यांची उपस्थिती होती.
विजेतेपदाची हॅट्ट्रिक
भारतातील विजेतेपदाची माझी हॅट््ट्रिक ठरली. याआधी मुझफ्फरनगर आणि पुणे येथे झालेल्या स्पर्धांमध्ये मी अजिंक्यपद मिळवले आहे. चांगली रँकिंग मिळवण्याचा माझा प्रयत्न राहील.
- तवेजा मॅजेरिक, विजेती टेनिसपटू