आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Novak Djokoviv, Maria Sharapova Won In Wimbledon

Wimbledon : नोवाक योकोविक, मारिया शारापोवा जिंकले; निशिकोरी बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक योकोविकने सहजपणे तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला गटात रशियन संुदरी मारिया शारापोवानेही आगेकूच केली. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात योकोविकने फिनलंडच्या जे. निमिनेनला ६-४, ६-२, ६-३ ने हरवले. पुरुष गटातील विजेतेपदाचा आणखी एक दावेदार जपानच्या केई निशिकोरी स्पर्धेबाहेर झाला. पोटरीच्या दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. यामुळे कोलंबियाच्या एस. गिराल्डोला पुढेचाल देण्यात आली.

पुरुष गटाच्या दुसऱ्या फेरीत योकोविकला निमिनेनकडून खास आव्हान मिळाले नाही. योकोविकच्या वेगवान सर्व्हिसला विरोधी खेळाडू समजू शकला नाही. योकोविकने फोरहँड ड्राइव्ह आणि बॅक हँड क्रॉस कोर्ट शॉट्स खेळून विरोधी खेळाडू त्रस्त केले. सामन्याचा निकाल अवघ्या ९१ मिनिटांत लागला. योकोविकने निमिनेनच्या तुलनेत सरस खेळ केला. योकोविकने ८, तर निमिनेनने २ ऐस मारले. सर्बियाच्या खेळाडूने एक डबल फॉल्टही केला. योकोविकने ३८ विनर्स, तर निमिनेनने १५ विनर्स मारले.

पुरुष गटातील इतर एका सामन्यात बल्गेरियाच्या जी. दिमित्रोवने अमेरिकेच्या एस. जॉन्सनला ७-६, ६-२, ७-६ ने हरवले. बेलारूसच्या डी. गॉफिनने इंग्लंडच्या एल. ब्रॉडीला ७-६, ६-१, ६-१ ने मात दिली. पुरुष गटातील इतर एका सामन्यात फ्रान्सच्या थॉमस गास्केटने आपल्याच देशाचा खेळाडू केडी शेपरला ६-०, ६-३, ६-३ ने हरवले.

शारापोवा सुसाट
चौथी मानांकित खेळाडू रशियाच्या मारिया शारोपावाने हॉलंडच्या आर. होगेनकाम्पला सरळ दोन सेटमध्ये हरवले. शारापोवाने ही लढत ६-३, ६-१ अशी एकतर्फी जिंकली. तिने हा सामना १ तास ४ मिनिटांत आपल्या नावे केला. या लढतीत शारापोवा आणि होगेनकाम्प या दोघींनी प्रत्येकी एक ऐस मारला. शारापोवाने तब्बल २३ विनर्स मारले.

लिएंडर पेस-नेस्टर दुसऱ्या फेरीत
पुरुष दुहेरीत भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस आणि त्याचा जोडीदार नेस्टर यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी दुसऱ्या फेरीत डी. लाजोविक-पी. ट्राईसिकी यांना ६-३, ६-४, ७-५ अशा फरकाने हरवले. लिएंडर पेस आणि नेस्टर या जोडीचा अनुभव या सामन्यात कामी आला.

निशिकोरीची यामुळे माघार
पाचवा मानांकित जपानचा केई निशिकोरी ११ दिवस आधीच हाले स्पर्धेत पोटरीच्या दुखापतीमुळे अडचणीत आला होता. त्या स्पर्धेतही तो सेमीफायनलमधून बाहेर झाला. मात्र, विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत निशिकोरीने इटलीच्या सायमन बोलेलीला मॅरेथॉन सामन्यात पाच सेटमध्ये ६-३, ६-७, ६-२, ३-६, ६-३ ने हरवले होते. मात्र, या सामन्यात त्याच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले. निराश निशिकोरी म्हणाला, "ही जुनीच दुखापत आहे. पहिल्या सामन्याच्या पाचव्या सेटमध्ये मला खूप त्रास झाला होता. मात्र, आज मी वॉॅर्मअप केला, तरीही अडचण कायम होती. अखेर मी सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.' निशिकोरीने माघार घेतल्यामुळे गिराल्डोला पुढेचाल मिळाली.

ऑस्ट्रेलियाची स्टोसूर जिंकली
महिला गटाच्या दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरने पोलंडच्या यू. रंदवास्काला ६-३, ६-४ ने मात दिली. ही लढत रंगतदार होईल, असे वाटत होते. मात्र, एकतर्फी सामना झाला. दुसऱ्या एका सामन्यात कजाकिस्तानच्या जेड. डायसने बेलारूसच्या एस. सानोविचला ७-५, ६-१ ने स्पर्धेबाहेर केले.