आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ‘मेरिट’वरच खेळाडूंची निवड: हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष अॅड. हितेन जैन याची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महाराष्ट्राच्या संघात यापूर्वी खेळाडूंची निवड कशी होत होती, हे सांगायला नको. आता यापुढे ही संघ निवड केवळ ‘मेरिट’ च्या आधारावर करण्यात येईल. राज्यातील खेळाडूंना व्यासपीठ व पैसा उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र हॉकी लीग स्पर्धेचे आयोजन विचाराधीन असल्याचे हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष अॅड. हितेन जैन यांनी सांगितले. हॉकी महाराष्ट्रच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी ते औरंगाबाद येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.    

संघटना खेळाडूंसाठी जास्तीत जास्त सुविधा निर्माण करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या जेथे अॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदानाची सुविधा निर्माण होऊ शकेल त्या ठिकाणी संघटना पाठपुरावा करणार आहे. काही जिल्ह्यांना एकत्र करून एका केंद्रावर आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर संघटनेचा भर आहे.  सध्या अजित लाक्रा, विक्रम पिल्ले हे आंतरराष्ट्रीय खेळाडू संघटनेसोबत काम करत आहेत. राज्यात अनुभवी प्रशिक्षक, माजी खेळाडूंच्या अनुभवाचा वापर युवा खेळाडूंच्या फायद्यासाठी करण्याची योजना असल्याचेही जैन म्हणाले.  

जिल्हा संघटनांना करणार मदत 
राज्य संघटनेची कॉर्पोरेट कंपन्यांशी संवाद साधून पैसा उभारण्याची तयारी आहे. जिल्हा संघटनांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही. सर्व जिल्हा संघटनांना बँकेत खाते उघडण्याची सूचना करण्यात आली असल्याचे जैन म्हणाले.

खेळाडूंसाठी स्पर्धा व मोफत साहित्य देणार    
जिल्ह्यात सर्व वयोगटातील जास्तीत जास्त स्पर्धा खेळवण्यात येईल. त्याचे वार्षिक नियोजन संबंधित संघटनेला करावयाचे आहे. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी माजी खेळाडूंकडून जुने साहित्य मागवले जाणार आहे. ते साहित्य खेळाडूंमध्ये मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे जैन यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...