आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनश्री धाडी, तुषार शिंदेच्या विक्रमाने गाजला दिवस, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उदघाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत तिसऱ्या दिवशी कोकण, नागपूरच्या खेळाडूंनी सोनेरी कामगिरी केली. दुसरीकडे जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत नाशिक व अमरावतीच्या खेळाडूंनी आम्हीही कुठे कमी नाही हे दाखवून दिले. त्याचप्रमाणे भालाफेक आणि थाळीफेक प्रकारात दोन नवीन विक्रमंाची भर पडली. मैदानी स्पर्धेत महिला गटात उंच उडी प्रकारात नागपूर विभागाच्या शुभांगी पवारने १.३४ मी. उंचीची उडी घेत सुवर्णपदक पटकावले. तिने नाशिक विभागाच्या अासरी शिंदेला १.३२ मी. मागे टाकले. शिंदेला रौप्यपदक मिळाले. अमरावती विभागाच्या आसरी ठाकूरने १.२५ मी. उडी घेत कांस्यपदक आपल्या खात्यात जमा केले.   

थाळीफेकीत तुषार शिंदेचा विक्रम : थाळीफेकीत कोकण विभागाचा स्टार खेळाडू  तुषार शिंदेने स्वत:चा मागील वर्षीचा ४०.६६ मीटरचा विक्रम मोडीत काढला. त्याने सोमवारी ४१.९७ मीटर लांब थाळी फेकून सोनेरी यश मिळवले. ठाणे शहरच्या समीर पठाणने (३६.६१ मी.) रौप्य मिळवून दिले. सीआरपीएफच्या  पंकज खोपडेला ३६.९९ मीटर थाळीफेक करून कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
 
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उदघाटन   
स्पर्धेचे उद््घाटन १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी ५.४५ वाजता ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या गोकूळ परेड मैदानावर होईल. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून फ्रान्सच्या विदेशातील कलाकारांसह देशातील व स्थानिक कलाकार कौशल्य सादर करतील.  
 
हॉकी : कोल्हापूर, एसआरपी संघ उपांत्य फेरीत 
साईच्या मैदानावर सुरू असलेल्या हॉकी स्पर्धेत तिसऱ्या दिवशी पहिल्या लढतीत कोल्हापूर विभागाने अमरावती विभागावर ९-० गोलने दणदणीत विजय मिळवला. अमरावतीचे खेळाडू मैदानात केवळ चेंडूच्या मागे धावत होते. विजेत्या संघाकडून उदय पाटीलने २७ व्या मिनिटाला, सत्यजित सावंतने ५ व्या आणि ३४ व्या मिनिटाला, मिलिंद मलालीने ५७ व्या आणि ५५ व्या मिनिटाला, असीम महानने ५८ व्या आणि ५९ व्या मिनिटाला तर सागर खांडगावेने ११ व्या व ६५ व्या मिनिटाला शानदार गोल करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दुसऱ्या सामन्यात रेल्वे पोलिस संघाने नागपूर विभागावर ३-१ गोलने मात केली. विजेत्या रेल्वे विभागाकडून पृथ्वीराज साळुंकेने ६ व्या मि., प्रवीण वाडेकरने ४५ व्या मि. आणि ६२ व्या मिनिटाला पृथ्वीराज साळुंकेने गोल केला. नागपूरकडून धर्मेंद्र राऊतने ६१ व्या मिनिटाला एकमेव गोल केला. 
 
विविध निकाल 
-   फुटबॉल - नागपूर परिक्षेत्र वि. वि. अमरावती परिक्षेत्र (१-०), कोल्हापूर परिक्षेत्र वि. वि. एसआरपीएफ परिक्षेत्र (१-०).  
-    खो-खो -  प्रशिक्षण संचालनालय वि वि. रेल्वे परिक्षेत्र (एक डाव व सात गुण), नागपूर परिक्षेत्र वि. वि. नागपूर शहर (एक डाव व २० गुण), कोल्हापूर परिक्षेत्र वि. वि. औरंगाबाद व नांदेड परिक्षेत्र (एक डाव आणि सात गुण), मुंबई शहर वि. वि. कोकण परिक्षेत्र.  
-    उंच उडी : शुभांगी पवार (१.३४ मीटर, नागपूर परिक्षेत्र), असारी शिंदे (१.३२, नाशिक परिक्षेत्र), आसरी ठाकूर (१.२५, अमरावती परिक्षेत्र).  
 
व्हॉलीबॉलमध्ये यजमान संघाची बाजी
पुरुष गटात औरंगाबाद-नांदेड संघाने नागपूरवर ७५-५३ गुणांनी विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत एसआरपीएफने कोल्हापूरवर ३-१ अशा सेटने हरवले. तिसऱ्या लढतीत कोकणने अमरावतीला १०४- ९६ गुणांनी पराभूत केले. रेल्वेनी प्रशिक्षण संचालनालयावर ३-० ने मात केली. 
 
बास्केटबॉल: रेल्वे विजयी ट्रॅकवर
रात्री उशिरा झालेल्या बास्केटबॉल लढतीत रेल्वे पोलिस संघाने नाशिक विभागावर अत्यंत रोमांचक परिस्थितीत अवघ्या २ गुणांनी विजय मिळवला.   रेल्वेने ६६-६४ गुणांनी सामन्यात बाजी मारली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकामागून एक सलग गुणांची कमाई करत अखेर रेल्वेने अवघ्या २ गुणांनी सामना आपल्या खिशात घातला. रेल्वेकडून महेश भगवान, मतीन शेख, विजय ठोसर यांनी शानदार गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. नाशिककडून सूरज धूम, कपिल गायकवाडचे प्रयत्न अपुरे पडले.