आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी ‘क्लाऊड नाइन’वर नव्हे, सातव्या अस्मानावर : सिंधू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ - तिरंग्यासाठी खेळले, १३२ वर्षांच्या इतिहासात पहिले ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकणारी महिला ठरले याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने ‘दिव्य मराठी’कडे दिली. सिंधूवर होत असलेला कौतुक, बक्षिसांचा वर्षाव थांबायला तयार नाही. या यशाने भारावलेल्या एकविशीतील सिंधूच्या शब्दांतही हेच भारावलेपण झळकत होते. तिच्यासोबतचा संवाद...

तुझे हे ऑलिम्पिक पदक भारतीय महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे वाटते का ?
सिंधू : प्रचंड मेहनत केल्यानंतरदेखील थकवा जाणवत नाही. या पदकाने फक्त मलाच नव्हे तर भारतीय बॅडमिंटनला व भारतीय महिलांना नवी ऊर्जा दिली आहे. या क्षणापासून माझे विश्व बदलले आहे. भारतीय महिला कुठेच कमी नाहीत. त्यांना फक्त स्वत:ला सिद्ध करायला संधी हवी असते, हे या पदकाने सर्व जगाला सिद्ध केले आहे.

- रिओ ऑलिम्पिकला येण्यापूर्वी तू पदक जिंकशील, असे वाटत होते का?
सिंधू : मी येथे आले तेव्हा पदकाची अपेक्षाही केली नव्हती. माझ्या गटाचा ड्रॉदेखील खडतर होता. त्यामुळे एकेका फेरीचाच मी विचार करत होते. त्यामुळे अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासादरम्यान माझ्यावर कधीही दडपण आले नाही. मी एकेका सामन्याचा विचार करून खेळत गेले. यामुळे फायनलपर्यंत पोहोचू शकले.

- या यशाने तुला ‘क्लाऊड नाइन’वर गेल्यासारखे वाटत असेल?
सिंधू : मी आज, ‘क्लाऊड नाइन’वर (हवेत) नव्हे ‘सातव्या अस्मानावर आहे. आजपासून पुढे माझे आयुष्य बदलणार... नव्हे, आतापासूनच बदललेही आहे.

- आता सर्वप्रथम काय करणार?
सिंधू : (जाेरात हसून) आधी गेम्स व्हिलेजमध्ये जाऊन भरपूर आइस्क्रीम खाणार, तिथल्या खाण्यावर ताव मारणार, जंक फूड खाणार. या पदकासाठीच्या त्यागामध्ये आणखी एक गोष्ट आहे. ती म्हणजे प्रशिक्षकांच्या ‘कस्टडीत’ ठेवलेला माझा मोबाइल फोन! आज तो मला परत मिळेल.

- कुटुंबाबाबत काय सांगशील ?
सिंधू : हो. आता फोन मिळाल्यानंतर सर्वप्रथम आई-वडिलांशी मनसोक्त बोलणार आहे. बरेच दिवस मी घराबाहेर आहे. त्यांना मी खूप ‘मिस’ करतेय. आई-वडिलांशी बोलल्यामुळे बरंच हलक वाटतं. आई-वडिलांचा आशीर्वाद, सपोर्ट असल्यामुळेच मी हे करू शकले. ४०० रुपयांचा शटलकॉक, रॅकेट खराब झाली की तारा जुळवायला हजारावर रुपये. कोर्टचे भाडेही पुष्कळ. पण त्यांनी या खर्चाकडे कधीही पाहिले नाही. माझा प्रत्येक हट्ट त्यांनी पुरवला.

- कुटुंबात खेळासाठी वातावरण कसे आहे ?
सिंधू : अर्थातच पोषक. याचे प्रमुख कारण म्हणजे माझे वडील स्वत: व्हॉलीबॉल खेळाडू आहेत, त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. आईही व्हॉलीबॉलपटू होती. याचा मला फायदा झाला. कारण एखाद्या खेळाडूला नेमके काय काय हवे आहे, आवश्यक आहे ते त्यांना अचूक कळते. प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळत गेली. सरावाच्या निमित्ताने आणि रिओ ऑलिम्पिकमुळे गेले दीड महिना मी घराबाहेर आहे. आता कधी एकदा घरी जाऊन आई-वडिलांना भेटते आणि पदक दाखवते, असे झाले आहे. आणि हो, घरी गेल्यावर आईच्या हातची ‘चिकन बिर्याणी’ खायचीय.

- थोडं सामन्याबाबत सांग ?
सिंधू : पहिल्या गेममध्ये मी पिछाडीवरून तिला गाठले व शेवटच्या क्षणी बाजी जिंकली. दुसऱ्या गेममध्ये सर्व्हिस चांगली झाली नाही. काही शटलकॉक अगदी रेषेवर पडले, जे गुण माझ्याविरुद्ध गेले. तिसऱ्या गेममध्ये १०-१० असं तिला रोखलं, तोपर्यंत सारं काही आलबेल होतं. पण त्या वेळीच शटलकॉकने दगा दिला. नेमबाजांसाठी जशी गोळी योग्य निवडणे गरजेचे असते, कारण तुम्ही बरोबर खेळूनही शटलकॉक जेव्हा विपरीत वागते, तेव्हा तुम्ही हतबल असता. १०-१० अशा बरोबरीनंतर काही काळ शटलकॉक खराब वाट्याला आल्याचा फटका मला बसला.

- सामन्यादरम्यान दोघींमध्ये कसली कुरबुर सुरू होती?
सिंधू : कॅरोलिना मला न विचारताच शटलकॉक बदलत होती. माझी मानसिक शांतता ढळावी यासाठी ती करत होती. काही वेळा मुद्दामच उशिरा कोर्टवर येत होती. पंचांनीही तिला समज दिली. माझ्याविरुद्ध तिची तक्रार होती की, मी गरज नसताना शटलकॉक बदलण्यास सांगत होते. पण मी शेवटच्या क्षणापर्यंत आशा सोडली नव्हती. कॅरोलिना उत्तम खेळत होती, तिनेही मला कमबॅक करायला नंतरच्या दोन्ही गेममध्ये संधी दिली नाही.

पुढे वाचा, सिंधूवर बक्षिसांचा पाऊस...
बातम्या आणखी आहेत...