आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा स्टार स्नूकरपटू अडवाणीचा १४ व्या विश्वविजेतेपदावर ताबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - भारताचा स्टार स्नूकरपटू पंकज अडवाणीने त्याच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवताना १४ व्या विश्वविजेतेपदावर ताबा मिळवला. प्रतिस्पर्ध्याला सहज नमवून पंकजने आयबीएसएफ विश्व बिलिअर्डस चॅम्पियनशीपमध्ये यश संपादन केले.
३० वर्षीय भारतीय खेळाडूने या खेळातील कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करताना प्रेक्षकांनाच रिझवले नाही तर ३ बॉल गेममध्ये सिंगापूर आणि सीएचआर (३९) च्या पीटर गिलख्रिस्टचा ११६८ गुणांनी धुव्वा उडवून जेतेपदाची माळ धारण केली.

अंतिम लढतीत सुरुवातीला काही गुण पीटरविरुद्ध गमावल्यानंतरही आपणच विजेतेपद मिळवणार याची मला खात्री होती. माझा क्रीडा सायकलॉजिस्ट असलेला भाऊ श्री सोबत चर्चा केल्यानंतर तर मला कोणतीही अडचण भासली नाही. मी दडपणाशिवाय अगदी आरामात खेळ केला. रात्री मी माझ्या रणनीतीसोबतच मनोधैर्याबाबत विचार करूनच रात्री झोपी गेलो. त्यामुळे सकाळच्या सामन्यात खेळताना माझ्यावर कोणतेही मनोवैज्ञानिक दडपण नव्हते.

या विजयासह गोल्डन बॉय नावाने प्रसिद्ध पंकजने केवळ एका आठवड्यापूर्वी पाईंट प्रकारात गिलख्रिस्टकडून झालेल्या पराभवाचाही वचपा घेतला. पहिल्या फ्रेममध्ये अडवाणीने १२७ गुणांची नोंद केली. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्याला गिलख्रिस्टविरुद्ध आघाडी मिळाली. सहा वेळा रेड स्नूकर विश्वविजेता राहिलेल्या पंकजने दुसऱ्या संधीत ३६० आणि तिसऱ्या संधीत ३०१ गुणांची नोंद करून पहिल्याच तासात विजयाचा पाया घातला होता. ७०० गुणांच्या मजबूत आघाडीस भारताचा स्नूकरपटू २८४, ११९, १०१, १०६ गुण घेत गिलख्रिस्टच्या फार पुढे निघून गेला.

पॉईंट व टाईम फॉरमॅटमध्येही जगज्जेतेपद : पंकज अडवाणीने २०१४ मध्ये २०१५ मध्ये जागतिक सहावी रेड स्नूकर चॅम्पियनशीप जिंकली. त्यानंतर त्याने बिलिअर्डसमध्ये विश्वविजेतेपद पटकावले. तत्पूर्वी २०१४ मध्ये पॉईंट अर्थात गुणांच्या आधारे तसेच ठराविक मुदतीत म्हणजे टाईम फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेचेही जगज्जेतेपद पटकावले होते.
असा मिळाला विजय

भारताच्या पंकज अडवाणीने सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टचा २४०८-१२४० गुणांनी पाडाव करून स्पर्धा जिंकली. पंकजने १२७, ३६०, ३०१, २८४, १२४, १०१,१०६, १७१,११४, ४३० गुणांचा ब्रेक घेतला. तर पीटरला १०२, १५६, २४९, १०७, १९८ गुणांचाच ब्रेक घेता आला.