आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डी लीग: बंगाल वॉरियर्सने जयपूर पिंक पँथर्सला २ गुणांनी हरवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता: प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी बंगाल वॉरियर्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा रंगला. दोन्ही संघ तुल्यबळ, मजबूत आणि दोन्ही संघांकडे एकापेक्षा एक खेळाडू. एकेका गुणासाठी दोन्ही संघांची जोरदार झुंज.अत्यंत रोमांचक ठरलेल्या लढतीत अखेर बंगाल वॉरियर्सने बाजी मारली. बंगालने गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्सला २८-२६ अशा अवघ्या २ गुणांच्या अंतराने हरवून बाजी मारली. घरच्या मैदानावरील पहिल्याच लढतीत बंगाल वॉरियर्सने सामन्यात मागे पडल्यानंतर जोरदार पुनरागमन करून विजय मिळवला. या पराभवानंतर गतविजेता जयपूर पँथर्स संघ गुणतालिकेत २ गुणांसह पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. तर बंगालचे या विजयानंतर पाच गुण झाले असून, हा संघ चौथ्या स्थानी आहे.

सामन्याचा एक मिनिट शिल्लक असताना बंगालची टीम २५-२६ अशी एका गुणाने मागे होती. मात्र, जयपूरचा एकमेव रेड बंगालने पकडताच पिंक पँथर्स ऑलआऊट झाले. बंगालला ३ गुणांचा फायदा झाला. त्यांनी २८-२६ असा सामना जिंकला.

पहिल्या हाफमध्ये जयपूर पँथर्स १५-१२ असे ३ गुणांनी पुढे होते. दुसऱ्या हाफमध्ये जसवीर सिंगच्या रेडच्या बळावर जयपूरने २०-१४ अशी आघाडी घेतली. ही आघाडी बघून संघ मालक अभिषेक बच्चनचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र, बंगाल वॉरियर्सने शानदार पुनरागमन केले. त्यांनी गुणांचे अंतर कमी केले. स्कोअर २०-२४, २१-२५, २३-२६ आणि २५-२६ असे झाले. अखेरच्या मिनिटांत बंगालने बाजी मारली.

यांची कामगिरी दमदार
बंगालसाठी नीलेश शिंदेने जबरदस्त डिफेन्स करताना ७ गुण जमवले. संघाचा विदेशी खेळाडू जांग कुन ली, कर्णधार दिनेशकुमार, बाजीराव हुडागे, महेश गौड यांनी प्रत्येकी ३ गुण मिळवले. महेंद्र राजपूतने २ गुण जुळवले. जयपूरचे प्रयत्न अपुरे पडले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अभिषेक बच्चन आणि सौरव गांगुलीचा सामन्यादरम्यान सेल्फी काढतानाचा फोटो