आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळातले बदल: प्रो कबड्डीने खेळ बनला अधिक रंगतदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'प्रो कबड्डी लीग' हा एक प्रयोग आहे. हे स्पर्धेचे दुसरे वर्ष असून यंदा १४ ऐवजी २५ खेळाडू संघात घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक होतकरू व ज्युनियर कबड्डीपटूंनाही विविध संघांनी संधी दिली. कबड्डीच्या लोकप्रियतेला, विकासाला हातभार लावण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आता कबड्डीत करिअर करता येते हा विचार वाढत आहे. शतकांचा इतिहास लाभलेला कबड्डी हा खेळ प्रो कबड्डी लीगच्या आगमनानंतर कमालीचा बदलला.

पुराणापासून विविध रूपांत आणि रंगाढंगात सुरू असलेला हा खेळ स्टार स्पोर्ट््स किंवा टेलिव्हिजन टच लाभताक्षणी अचानक बदलून गेला. खेळाच्या मुख्य स्वरूपाला बदलांचे घाव न घालता नीटनेटके रूप देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. एकेकाळी श्रमिक वर्गाचा असलेला हा खेळ उच्चभ्रूंच्या दिवाणखान्यात दोन वर्षांतच मानाचे स्थान पटकावून बसला. चित्रपट कलावंत, ज्यांना भारतीय जनमानसात मानाचे स्थान दिले जाते. त्यांनी बघ्याची भूमिका घेतली नाही. उलटपक्षी आयपीएलच्या धर्तीवर आयोजित करण्यात येत असलेल्या या खेळातील संघाचे पुरस्कारपद स्वीकारले. फ्रँचायझींना विकत घेण्याचे औदार्य त्यांनी दाखवले. स्पर्धेच्या सामन्यांना जातीने हजेरी लावली. जाहिरातींमध्ये विनामूल्य योगदान दिले. एक समाजकार्य या भावनेने त्यांनी कबड्डी या खेळाच्या ‘प्रमोशन’कडे पाहिले. स्टार टेलिव्हिजन वाहिनी आणि मशाल स्पोर्ट््स क्लब यांनी भारतीय कबड्डी संघटनेच्या मदतीने आयोजन केले. यामध्ये स्टार टेलिव्हिजन वाहिनीची भूमिका व कार्य निर्णायक ठरले. त्यांनी भारतीयांचाच हा खेळ भारतातील भारतीय आणि जगभरातल्या भारतीयांपुढे आकर्षक स्वरूपात सादर केला.
सर्वप्रथम त्यांनी या खेळात ख-या अर्थाने रंग भरण्यासाठी खेळाडूंना विविध रंगांचे आकर्षक गणवेश दिले. कबड्डीचे मातीचे मैदान जाऊन तेथे आकर्षक, ‘फ्लुरोसंट’ रंगांनी युक्त अशी मॅट बसवली. त्यामुळे प्रेक्षकांना सतत आकर्षक रंगसंगती व पार्श्वभूमी पाहावयास मिळाली.
सामन्यांच्या वेळी आणखी वेगळेपण यावे यासाठी प्रेक्षक गॅलरीत संपूर्ण काळोख करून फिरते प्रकाशझोत टाकण्यात आले होते. एका आगळ्यावेगळ्या दुनियेची अनुभूती या निमित्ताने करून देण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष मैदानावर मात्र कृत्रिम असे काहीही नव्हते. चढाई, पकडींचा बहारदार खेळ सुरू होता. नवे नियम, नव्या अटी यामुळे स्टार टीव्हीने खेळात आणखी वेग आणि जोश भरला. पहिल्या वर्षी खेळाडूंना कबड्डी...कबड्डी...हा दम न घेण्याची मुभा देण्यात आली होती. हेतू हा होता की, खेळाडूंची अधिक दमछाक न होता ते ताजेतवाने राहावेत. त्यामुळे अधिक जोशपूर्ण चढाया आणि कसदार पकडी पाहावयास मिळाव्यात, हा नवा प्रयोग होता.