आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डीचे तिसरे सत्र येत्या जानेवारीपासून, एकूण ६० सामने होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पहिल्या दोन हंगामातील यशानंतर यंदा प्रो कबड्डीने २०१६ च्या जानेवारी महिन्यातच तिसऱ्या अध्यायाची नव्या कल्पनांनी सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. ३० जानेवारीला हैदराबादच्या गच्ची बौली स्टेडियमवर यजमान तेलगू टायटन्स आणि गतविजेते यू मुंबा यांच्यातील लढतीने प्रो कबड्डीच्या मुहूर्ताचा नारळ फुटेल.

तिसऱ्या हंगामाचे वैशिष्ट्य म्हणजे विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेल्या मॅटवर तिसऱ्या लीगचे एकूण ६० सामने होतील. प्रत्येक फ्रँचायझीच्या गावातून शुभारंभ करण्याच्या संकेतानुसार यंदा हैदराबादमधून प्रो कबड्डीचा नवा हंगाम सुरू होईल. एकूण आठ संघांचा हा जथ्था हैदराबादहून आपला प्रवास सुरू करून ५ मार्च रोजी दिल्लीत समारोप करील. या प्रवासादरम्यान हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता, पुणे, पाटणा, जयपूर, दिल्ली, मुंबई या शहरांमध्ये ८ संघ डेरा टाकतील. अंतिम व उपांत्य लढतीसाठी पात्र ठरलेले संघ दिल्लीत शेवटी दाखल होतील. ८ शहरांमधील ३४ दिवसांच्या व ६० सामन्यांच्या या कबड्डी प्रवासाची दिल्लीच्या त्यागराज क्रीडा संकुलावर सांगता होईल. मागच्या वेळी स्पर्धेची तिकिट महागडे होते. यंदा चाहत्यांसाठी तिकीट दर स्वस्त होण्याची आशा आहे.
संघटकांची खंत
स्टार स्पोर्ट्स पुरस्कृत असलेला कबड्डी स्पर्धेचा हा व्यावसायिक प्रकार जगातील अव्वल संघांच्या खेळाडूंच्या सहभागामुळे आणि आकर्षक, रंगीत आणि नावीन्यपूर्ण थेट प्रक्षेपणामुळे जगभरातील क्रीडारसिकांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, देशातील स्थानिक कबड्डी रसिक, स्थानिक खेळाडू आणि क्रीडा संघटक या प्रो कबड्डी प्रवाहात सामावले गेले नाहीत. या खेळाच्या व्यावसायिकतेचा लाभ मूठभर खेळाडू, संघटक वगळता कुणालाही झाला नसल्याची खंत स्थानिक संघटक, खेळाडू आयोजकांनी व्यक्त केली आहे.