आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डी लीगः जयपूर पिंक-तेलुगू टायटन्स लढत बरोबरीत सुटली! दोन्ही संघांची ३९-३९ गुण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारी झालेल्या लढतीत तेलुगू टायटन्सच्या खेळाडूला पकडताना जयपूर पिंक पँथर्सचे खेळाडू. - Divya Marathi
प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारी झालेल्या लढतीत तेलुगू टायटन्सच्या खेळाडूला पकडताना जयपूर पिंक पँथर्सचे खेळाडू.
हैदराबाद - प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारचा सामना अत्यंत रोमांचक ठरला. गतविजेते जयपूर पिंक पँथर्स आणि तेलुगू टायटन्स यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. दोन्ही संघांत एकेका गुणासाठी जोरदार झुंज रंगली. सामना संपला त्यावेळी जयपूर-तेलुगू संघ ३९-३९ असे बरोबरीत होते. दोन्ही संघांनी चांगला खेळ करून मैदान गाजवले. मात्र, अखेरच्या क्षणी संथ खेळ आणि बचावात्मक पवित्र्यामुळे जयपूरच्या हातून विजय निसटला. दुसरीकडे तेलुगू टायटन्सने हातातून गेलेला सामना जिद्दीने खेचून आणत पराभव टाळला.

तब्बल १५ चढायांत फक्त एकदा बाद होऊन सर्वाधिक गुणांची कमाई करणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सच्या सोनू नरवालला "मॅन ऑफ द मॅच'च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये तेलुगू टायटन्स, तर दुसऱ्या हाफमध्ये जयपूर पिंक पँथर्सच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. मात्र, अखेरच्या क्षणी तेलुगूने बरोबरी केली. मध्यंतराला तेलुगू टायटन्सने २०-१२ अशी ८ गुणांची भक्कम आघाडी घेतली होती. यंदाच्या प्रो कबड्डीच्या या दुसऱ्या सत्राच्या पहिल्या टप्प्यात तेलुगू टायटन्सने जयपूर पिंक पँथर्सला ३२-२२ ने मात दिली होती. त्यामुळे ही मॅचही ते सहज जिंकतील असे वाटत होते, तर जयपूर पराभवाचा वचपा काढण्यासाठी खेळेल, अशी आशा होती. झालेही तसेच. जयपूर पिंक पँथर्सच्या सोनू नरवालने तुफान खेळ केला. त्याने १३ पैकी ९ गुण दुसऱ्या हाफमध्ये मिळवले. सलग ९ चढायांत ८ गुण पटकावण्याचा विक्रमही त्याने केला. त्याच्या चढायांचा धडाका इतका होता की जयपूर पिंक पँथर्सने सलग दोन लोण तेलुगू टायटन्सवर चढवले. ३४ व्या मिनिटाला त्यांनी ३१-३१ अशी बरोबरी केली. ३७ व्या मिनिटाला ही आघाडी ३९-३४ अशी पाच गुणांची होती.

विजय मिळाल्याच्या थाटात जयपूर पिंक पँथर्स गाफील झाले. याचा फायदा तेलुगूने घेतला. पुढच्या ३ मिनिटांत सलग ५ गुणांची कमाई करत तेलुगू टायटन्सने बरोबरी साधली. मॅचची शेवटची चढाई पिंक पँथर्सकडे होती. कर्णधार जसवीर सिंग चढाई करत होता. जोखीम न घेता त्याने वेळ काढला आणि सामना टाय केला. सामन्यात जसवीरने १२ चढाया करताना ४ गुण मिळवले.

चार वेळा त्याच्या पकडी झाल्या. आणि चार चढाया निष्फळ ठरल्या. मॅच बरोबरीत सुटली असली, तर कर्णधार जसवीरच्या बचावात्मक आणि अखेरच्या क्षणी चुकलेल्या धोरणामुळे जयपूरने विजयाची संधी गमावली.
तेलुगूचे राहुल चौधरी, सुकेश हेगडे तळपले
मध्यंतराला यजमान तेलुगू टायटन्सने २०-१२ अशी मोठी आघाडी घेतली ती राहुल चौधरी आणि सुकेश हेगडे यांच्या भेदक चढायांच्या जोरावर. दोघांनीही प्रत्येकी ५ गुण मिळवले. त्यांनी बचावफळीचीही मस्त साथ मिळाली. गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार जसवीर सिंग पहिल्या ५ मिनिटांमध्ये चढाईला गेला नाही. तेव्हाच त्यांच्यावरील दडपण जाणवत होते. जसवीरला एकही गुण चढाईमध्ये घेता आला नाही, सोनू नरवाल एकटाच गुण मिळवत होता. जयपूर पिंक पँथर्सला बचावामध्ये केवळ एकच गुण घेता आला. यावरून त्यांचा बचाव किती दुबळा झाला हे, दिसत होते. गेल्या सत्रात त्यांनी बचावावरच अनेक सामने जिंकले होते. मात्र, यंदा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.