मुंबई - गतवर्षीच्या यशानंतर यंदा पुन्हा एकदा मशाल स्पोर्ट््स आणि स्टार स्पोर्ट््स टेलिव्हिजन वाहिनीने प्रो कबड्डी लीगचे शिवधनुष्य उचलले आहे. येत्या १८ जुलै ते २३ ऑगस्ट या कालावधीत भारतातील ८ शहरांमध्ये एकूण ६० कबड्डी लढती होतील.
महाराष्ट्रामध्ये तुफान लाेकप्रिय ठरलेल्या प्राे कबड्डी लीगविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता लागलेली अाहे. ३७ दिवसांच्या कालावधीत या भारतीय खेळाची पताका जगभरात फडकावण्यासाठी स्टार टीव्हीने यंदाही काही नवे प्रयोग केले आहेत. गतविजेत्या जयपूरच्या पिंक पँथर्स आणि अंतिम फेरीपर्यंत मजल मारणा-या ‘यु मुंबा’ यांच्यातील लढतीने २०१५ च्या प्रो कबड्डी लीगला मुंबईत सुरुवात होईल. १८, १९, २०, २१ जुलै या सलग चार दिवसांमध्ये मुंबईच्या एनएससीआय इनडोअर स्टेडियममध्ये मुंबई, जयपूर, हैदराबाद, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, पाटणा, पंजाब या शहरांच्या फ्रँचायझींमध्ये लढती होतील. ८ शहरांच्या या फ्रँचायझींमध्ये मुंबईत एकूण ७ लढती होतील.