आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डी लीग: तेलुगू टायटन्सची बंगाल वॉरियर्सवर मात! टायटन्सचा ४४-२८ ने विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी तेलुगू टायटन्स संघाने जबरदस्त खेळ करताना बंगाल वॉरियर्स संघाला धूळ चारली. तेलुगू टायटन्स संघाने दमदार प्रदर्शन करताना ४४-२८ असा एकतर्फी सामना जिंकला. दीपक हुड्डा, राहुल चौधरी आणि सुकेश हेगडे या खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करताना तेलुगू संघाच्या विजयात योगदान दिले. मंगळवारीसुद्धा तेलुगू टायटन्सने शानदार कामगिरीकरताना पराभवाच्या उंबरठ्यावरून जयपूर पिंक पँथर्ससोबत सामना ड्रॉ केला होता.

तेलुगू टायटन्सच्या विजयाच्या दीपक हुड्डाने विजयी कामगिरी केली. त्याने १४ चढायांत ५ गुण मिळवले. शिवाय ६ दमदार पकडीही केल्या. राहुल चौधरीने १० गुणांची कमाई करताना दीपक हुड्डाने चांगली साथ दिली. तर सुकेश हेगडेने तिन्ही निर्णायक चढायांत बोनस गुण वसूल करत तेलुगू टायटन्सची बाजू भक्कम केली. पहिल्या हाफमध्ये तेलुगू टायटन्सने २५-८ अशी भक्कम आघाडी घेत निर्णायक विजयाकडे कूच केली होती. १८ व्या मिनिटालाच तेलुगू टायटन्सने बंगाल वॉरिअर्सवर लोण पेश करत आपल्या आक्रमक खेळाची प्रचिती दिली. मात्र, पुढे त्यांना हा आक्रमक खेळ कायम ठेवता आला नाही.
महेंद्रची एकाकी झुंज
बंगाल वॉरियर्सकडून महेंद्र राजपूतने एकाकी झुंज दिली. विशेष म्हणजे महेंद्र राजपूत बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. त्याने १२ चढायांत दोन बोनस गुणांसह १४ गुण कमावले. विशेष म्हणजे बंगाल वॉरियर्सच्या एकूण २१ गुणांत त्याच्या एकट्याचा वाटा निम्म्याहून अधिक होता. तेलुगू टायटन्सचे आता ९ सामन्यांत ६ विजयांसह ३४ गुण झाले आहेत. गुणतालिकेत तेलुगू दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे बंगालच्या नावे ७ सामन्यांत फक्त एकच विजय आहे. बंगाल सातव्या क्रमांकावर आहे.