आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूर्वा पल्लीवालचा आंतरराष्ट्रीय रौप्यपदकावर निशाणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सेऊल (द. कोरिया) येथील इंटरनॅशनल यूथ स्पोर्ट््स फेस्टासाठी भारतीय संघात निवड झालेली महाराष्ट्र व अमरावतीच्या समर्थ अकादमीची तिरंदाज पूर्वा पल्लीवालने ६० मी. रिकर्व्ह प्रकारात देशाला सांघिक रौप्यपदकाची कमाई करून दिली. या प्रकारातील अंतिम फेरीत यजमान द. कोरियाकडून भारत ५-३ ने माघारल्यामुळे महिला संघाला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मिश्र दुहेरीतही भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

रिकर्व्ह महिला संघात पूर्वा पल्लीवाल (महाराष्ट्र), अंकिता भगत (झारखंड), समजित कौर (पंजाब) या तीन महिला धनुर्धरांचा समावेश हाेता. प्रशिक्षक गणेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या पूर्वाने आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी दिल्ली येथील निवड चाचणीद्वारे भारतीय रिकर्व्ह संघात स्थान पटकावले होते. सरावासाठी लहानसे मैदान अन् सर्वसामान्य सुविधा असतानाही तिने दक्षिण कोरियासारख्या मातब्बर संघाविरुद्ध दमदार कामगिरी करून अमरावती अन् महाराष्ट्राचे नाव उंचावले. सेऊल शहरात ३ ते ९ सप्टेंबर या कालावधीत आयोजित यूथ स्पोर्ट््स फेस्टा २०१५ मध्ये सहभागी भारताच्या मिश्र संघानेही कोरियाविरुद्ध ६-२ गुण मिळवून रौप्यपदक जिं कले. या संघात अंकिता भगत आणि मुकेश बोरो यांचा समावेश होता.

मंगळवारी भारतीय पुरुष रिकर्व्ह संघ उपांत्य फेरीत फिलिपाइन्सविरुद्ध झुंजणार आहे. मुकेश, आदित्य व राॅबिन प्रशिक्षक, राम अवधेश, अशोककुमार यादव यांच्या मार्गदर्शनात लक्ष्यभेद करण्यास सज्ज आहेत. अंकिता भगतने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

माझी स्वत:शीच स्पर्धा
मी स्वत:च स्वत:शी स्पर्धा करते. धनुर्विद्येच्या साधनेलाच आपले कर्म मानते, असे पूर्वाने कोरियाकडे प्रस्थान करताना सांगितले होते. गेल्या अनेक वर्षांपासून मी दिवसातून आठ ते दहा तास सराव करते. या खेळात अचूकता महत्त्वाची असते. प्रत्येक गुण महत्त्वाचा असतो.

आंतरराष्ट्रीय पदक जिंकणारी "समर्थ'ची एकमेव
पूर्वा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकणारी समर्थ आर्चरी अकादमीची पहिलीच खेळाडू असून गेल्या काही वर्षांत राज्य शालेय, राष्ट्रीय व नॅशनल रँकिंग स्पर्धेतील यशस्वी कामगिरीच्या आधारे तिने हे यश संपादन केले आहे.