आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधू मकाऊ ओपनच्या फायनलमध्ये, ६० मिनिटांत यामागुचीवर मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकाऊ - भारतीय स्टार आणि पाचवी मानांकित पी.व्ही. सिंधूने शनिवारी आपले विजयी अभियान कायम ठेवताना १ लाख २० हजार डॉलर बक्षीस रक्कम असलेल्या मकाऊ ओपन ग्रां.प्री. बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सिंधूने नववी मानांकित जपानच्या अकाने यामागुचीला एक तास चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात २१-८, १५-२१, २१-१६ ने हरवले. फायनलमध्ये धडक दिल्याने सिंधूचे आता एक पदक तर निश्चित झालेच आहे.
या विजयासह सिंधूने २०१३ च्या योनेक्स जपान ओपमध्ये यामागुचीकडून झालेल्या पराभवाचाही हिशेब चुकता केला. आपल्या तिसऱ्या किताबासाठी सिंधूपुढे फायनलमध्ये जपानची मिनात्सू मितानी आणि चीनची बिंगजियाओ यांच्यातील विजेती खेळाडू असेल. शानदार फॉर्मात असलेल्या सिंधूने सुरुवातीपासूच आपला दबदबा कायम ठेवला. सिंधूने पहिला गेम अवघ्या १४ मिनिटांत २१-८ ने आपल्या नावे केला. तिने खूपच आक्रमक खेळ करीत यामागुचीला त्रस्त केले. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये यामागुचीने पुनरागमन करताना काही महत्त्वपूर्ण गुण मिळवले. दुसऱ्या गेममध्ये यामागुचीने २१-१५ ने बाजी मारताना सामना १-१ ने बरोबरीत सोडवला.

निर्णायक सामन्यात सिंधूने सुरुवातीला ११-५ ने आघाडी मिळवली. यानंतरही यामागुचीने संघर्ष कायम ठेवला. तिने पुनरागमनाचे प्रयत्न केले. मात्र, सिंधूने जोरदार खेळ करताना गेम २१-१६ ने जिंकत फायनलमध्ये धडक दिली. फायनलचा सामना रविवारी होईल.
सामना सोपा नव्हता..
हा सामना मुळीच सोपा नव्हता. तिसरा सेट निर्णायक होता. तिसऱ्या सेटमध्ये मी डोके शांत ठेवून खेळले आणि विरोधी खेळाडूच्या चुकांचा फायदा उचलला. यामागुचीने जोरदार संघर्ष केला.
पी.व्ही. सिंधू, विजयानंतर.