आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डीतील राजकारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रो कबड्डीला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद बघून स्टार स्पोर्ट््स कंपनीच्या अधिकाऱ्यांना वर्ल्डकप अायोजनाची कल्पना सुचली. स्टार स्पोर्ट््सने पुढाकार घेऊन कबड्डी फेडरेशनला वर्ल्डकपसाठी गळ घातली.
खेेळ आणि क्रीडा संघटनांतील राजकारण ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. विविध खेळांच्या संघटनांतील पदाधिकारी नैतिकता सोडून आपल्या पदासाठी, खुर्चीसाठी, वलयांकित प्रसिद्धीसाठी तसेच खेळात वाढत असलेल्या अर्थकारणामुळेही राजकारण करत असल्याचे दिसून येते. देशातील क्रिकेट संघटनांतील राजकारण आणि राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप संपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला लोढा समितीच्या रूपाने हस्तक्षेप करावा लागला. खेळातील राजकारणापासून कबड्डी हा खेळ आणि या खेळाची संघटनासुद्धा अलिप्त नाही. दोन दिवसांपूर्वीच गुजरातच्या अहमदाबादेत वर्ल्डकप कबड्डीचे फायनल झाले. भारताने इराणला ३८-२९ ने पराभूत करून विश्वविजेतेपद जिंकले. देशातील कबड्डीप्रेमी, क्रीडाप्रेमींना हे विजेतेपद बघून जल्लोष करण्याची संधी मिळाली. इथपर्यंत सर्व ठीक आहे. मात्र, भारतीय कबड्डी फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनने सर्वसामान्य भारतीयांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे, अशी शंका घेण्यास जागा आहे.
कबड्डीमध्येही दोन प्रकार झाले. स्टँडर्ड कबड्डी आणि सर्कल कबड्डी. स्टँडर्ड कबड्डी म्हणजे आपली पारंपरिक कबड्डी, मात्र मॅटवर खेळवली जाणारी. अहमदाबाद येथे झालेली स्टँडर्ड कबड्डी स्पर्धा इंटरनॅशनल कबड्डी फेडरेशन आणि अमॅच्युअर भारतीय कबड्डी महासंघ यांनी आयोजित केली होती. या खेळाचे हे तिसरेच वर्ल्डकप ठरले. याआधीचे वर्ल्डकप २००४ मध्ये मुंबई आणि २००७ मध्ये पनवेल येथे झाले. अहमदाबादेतील वर्ल्डकप तब्बल नऊ वर्षांच्या खंडानंतर झाले. स्टार स्पोर्ट््स या वाहिनीतील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्यामुळे ही स्पर्धा शक्य झाली.
या आयोजनात अमॅच्युअर भारतीय कबड्डी महासंघ आणि इंटरनॅशनल कबड्डी फेडरेशन यांचा प्रत्यक्ष वाटा खूप कमी ठरला. खेळातील अर्थकारणामुळे या संघटनांनी या स्पर्धेसाठी स्टार स्पोर्ट््स समूहाला मदत केली. स्टार स्पोर्ट््सने खेळावर तीन, चार चॅनल सुरू केले. या सर्व चॅनलवर प्रोग्रामिंगची मारामार असते. बऱ्याच वेळा झालेल्या स्पर्धा आणि हायलाइट्स त्यावर सुरू असते. हे सर्व चॅनल सुरू ठेवण्यासाठी, टीआरपी कायम ठेवण्यासाठी या समूहाला सातत्याने कोणत्यान् कोणत्या खेळाच्या स्पर्धा प्रक्षेपित कराव्या लागतात. प्रो कबड्डी लीग ही स्पर्धा स्टार स्पोर्ट््स समूहाचीच. प्रो कबड्डीला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद बघून स्टार स्पोर्ट््स कंपनीच्या अधिकाऱ्यांना वर्ल्डकप अायोजनाची कल्पना सुचली. स्टार स्पोर्ट््सने पुढाकार घेऊन कबड्डी फेडरेशनला वर्ल्डकपसाठी गळ घातली. प्रो कबड्डीच्याच प्रायोजकांना वर्ल्डकपसाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. काही प्रायोजक नव्याने जुळले. कबड्डी फेडरेशनला घरबसल्या वर्ल्डकप आयोजनाची संधी मिळाली. भारताचे जे. एस. गेहलोत हे इंटरनॅशनल कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांनी स्पर्धेेसाठी १२ संघ तयार केले. ज्या देशात स्टार स्पोर्ट््स समूहाचे नेटवर्क आहे त्या देशांतील संघांना स्पर्धेेत सामील करण्यात आले. इंग्लंड, कॅनडा अशा देशांत भारतीयांची संख्या अधिक आहे. त्या देशांतील भारतीयांना हाताशी धरून, त्यांना थोडे प्रशिक्षण देऊन संघात सामील करण्यात आले. कबड्डी खेळत असलेले इराण, बांगलादेश, मलेशिया, थायलंड, नेपाळ या आशियाई संघांनाही विश्वचषकात सामील करण्यात आले. असे मोडून तोडून १२ संघ फेडरेशनने उभे केले. या विश्वचषक फेडरेशनला आणि खेळाडूंना पैसा मिळाला. स्टार समूहाला एक इव्हेंट, प्रायोजक आणि टीआरपी मिळाले. या खेळावर प्रेम करणारे खरेखुरे मात्र भाबडे क्रीडाप्रेमी या सर्व अर्थकारण, राजकारणापासून दूरच राहिले. या विश्वचषक कबड्डी स्पर्धेला खरोखर किती महत्त्व द्यायला हवे हा मोठा प्रश्नच आहे. कबड्डी फेडरेशनने क्रीडा चाहत्यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. ही स्पर्धा अधिकृत अाहे की नाही हाच सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण या विश्वचषकात सहभागी होण्यासाठी देशांची पात्रता स्पर्धा झाली नाही. या विश्वचषकात सहभागी होण्याचे निकष एकच होते, ज्यांना कबड्डी खेळता येते त्या देशांतील संघांनी यात सहभागी व्हावे. काही देशांत संघबांधणी होत नव्हती. अशा देशांना इंटरनॅशनल कबड्डी फेडरेशनने स्थानिक भारतीय, अाशियाई खेळाडू पुरवून मदत केली. भारताचा संघ निवडताना कोणतीच निवड चाचणी झाली नाही. मग वर्ल्डकपसाठी भारतीय कबड्डी संघाची निवड कशी झाली हा मोठा प्रश्नच आहे. भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. ज्या कबड्डीत महाराष्ट्राचा बोलबाला आहे त्या कबड्डी खेळातील राष्ट्रीय संघात एकही महाराष्ट्राचा खेळाडू नसावा हे मोठे कोडे होते. वर्ल्डकप कबड्डी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय खेळाडूंना त्यांचे चेहरे, त्यांचे राज्य बघून निवडण्यात आले की काय अशी शंका येते. भारतीय संघातील बहुतेक खेळाडू प्रो कबड्डी लीगचे सदस्य आहेत.
जेथे अर्थकारण असेल त्या खेळाच्या संघटनांत राजकारण होणार नसेल तर नवलच. २०१६ च्या आधी नऊ वर्षे कबड्डी वर्ल्डकपचे आयोजन का झाले नाही ? २००४, २००७, २०१६ हे तिन्ही वर्ल्डकप भारतातच झाले. इतर देशांत कबड्डी नावालाच आहे? कबड्डीचा ऑलिम्पिक प्रवेश कधी होणार? कबड्डीला खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर कधी ओळख मिळणार ?... या प्रश्नांची उत्तरे सोडवणे हिमालयावर चढाई करण्याइतकेच कठीण काम आहे.
बातम्या आणखी आहेत...