आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदाधिकाऱ्यांत वादाचा सामना !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ - रिओ ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात व्हायला काही तासच शिल्लक राहिले असताना भारतीय क्रीडाधिकाऱ्यांमध्ये वादाचा सामना रिओमध्ये सध्या रंगला आहे. हॉकी इंडियाचे नरेंद्र बात्रा यांनी भारतीय पथक प्रमुख राकेश गुप्ता यांच्यावर अनेक आरोपांची अस्त्रे सोडली असून तमाम क्रीडाविश्व भारतीय क्रीडाधिकाऱ्यांमधील या सुंदोपसुंदीचा आनंद घेत आहे.
हॉकी संघांतील खेळाडूंना टीव्ही संच हवेत, टेबल आणि खुर्च्या हव्या होत्या. परंपरेनुसार पथक प्रमुख गुप्ता यांनी केवळ प्रसिद्धिमाध्यमांना माहिती दिली की भारतीय दूतावासामार्फत या गोष्टींची खरेदी करून दिली जाणार आहे. प्रत्यक्षात काहीही घडले नाही. त्यामुळे हॉकी इंडियाचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर रोएलंट ओल्टमस यांनी स्वत: २८ खुर्च्या व ५ टेबले आणली.
त्यावर नरेंद्र बात्रा यांनी हॉकी खेळाडूंचा फोटो प्रसिद्ध करून या खुर्च्या व टेबल्स आयओएने आणलेल्या नाहीत, अशी पुस्तीही सोबत जोडली. गप्प बसले तर ते बात्रा कसले! त्यांनी भारतीय पथकाचे अकार्यक्षम प्रमुख राकेश गुप्ता स्वत:चे फोटो छापून आणण्यात गुंग असल्याचे जाहीर करून टाकले.
ओल्टमन यांना बात्रा यांनी संघाच्या गरजेच्या वस्तू विकत घेण्याची परवानगी देऊन टाकली. पथक प्रमुखांकडून काहीही अपेक्षा करू नका, असे सांगायलाही बात्रा विसरले नाहीत.
हॉकी संघांची टेलिव्हिजन सेटची मागणी पूर्ण करणार, असे कळताच अन्य भारतीय पथकांनीही आपल्यालाही टीव्ही सेट हवे असल्याची मागणी केली. भारतीय खेळाडू पर्यटनाला आले आहेत, टेलिव्हिजन पाहायला की पदके जिंकायला, असा संभ्रम भारतीय क्रीडाधिकाऱ्यांमधील ही लढाई पाहणाऱ्यांना पडला आहे. या वादामुळे भारतीय गटाची ऑलिम्पिक क्रीडाग्राममध्ये प्रतिमा बिघडली आहे.
काय होता वाद?
रिओनगरीत येताच भारतीय खेळाडूंनी तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली होती. टीव्ही नाही, केबल नाही, फर्निचर-खुर्च्या नाहीत अशा एकामागोमाग एक तक्रारी भारतीय खेळाडूंनी केल्या. यानंतर आयओसीने भारतीय पथक प्रमुखाला खडे बोल सुनावले होते.
बातम्या आणखी आहेत...