आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विस ओपन : राफेल नदालला हरवत रॉजर फेडररने मिळवले विजेतेपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बासेल - अनुभवी आणि अव्वल मानांकित राॅजर फेडररला आपला कट्टर प्रतिस्पर्धी स्पेनच्या राफेल नदालला अखेर तीन वर्षांत पहिल्यांदा नमवण्यात यश आले. त्याने स्विस इनडोअर टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये नदालला ६-३, ५-७, ६-३ ने हरवले. सामन्याचा निकाल दोन तास आणि तीन मिनिटांत लागला. फेडररच्या कारकीर्दीचा हा ८८ वा किताब ठरला. दोन्ही खेळाडूंदरम्यान हा तब्बल ३४ वा सामना होता.

अव्वल मानांकित फेडरर आणि तिसरा मानांकित नदाल म्हणजे टेनिसच्या इतिहासातील पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात. यापूर्वी फेडररने अखेरीस नदालला इंडियन वेल्स २०१२ च्या सेमीफायनलमध्ये हरवले होते. मागच्या तीन वर्षांत नदालने फेडररला पाच वेळा हरवले आहे. फेडरर आणि नदालचा मागच्या २१ महिन्यांत सामना झाला नव्हता. यामुळे बासेल येथे झालेला दोघांतील सामना दोघांच्या चाहत्यांसाठी महत्त्वाचा होता. घरच्या कोर्टवर खेळण्याचा १७ वेळेसचा ग्रँडस्लॅम विजेता फेडररला फायदा झाला. पहिला गमावल्यानंतर नदालने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले होते. मात्र, तिसरा सेट गमावला.

बासेलमध्ये सर्वोत्तम
बासेलमध्ये हा माझा सर्वोत्तम आठवडा ठरला. मी माझ्या कारकीर्दीत खूप काही मिळवले आहे. येथे जिंकण्याचा आनंद काही औरच असतो. मला दुसरा सेट जिंकण्याची संधी होती. मात्र, नदालने पुनरागमन केले.
रॉजर फेडरर