आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Roger Fedred Through In Fourth Round Of Wimbledon

Wimbledon : फेडररची चौथ्या फेरीत धडक, सानिया तसेच पेसची आगेकूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - "स्विस किंग' नावाने जगभर प्रसिद्ध असलेल्या रॉजर फेडररने शनिवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील सेंट्रल कोर्ट गाजवले. स्विस एक्स्प्रेसप्रमाणे खेळ करताना फेडररने चौथ्या फेरीत धडक दिली. रॉजर फेडररशिवाय महिला गटात कॅरोलिन वोज्नियाकीनेही आगेकूच केली. मात्र, गत विजेती पेत्रा क्विताेवा स्पर्धेतून बाहेर पडली.
पुरुष गटात स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदालला पराभूत करून खळबळ माजवणाऱ्या जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनला सर्बियाच्या ट्रोव्हिस्कीने स्पर्धेबाहेर केले. फेडररने २ तास १६ मिनिटे रंगलेल्या तिसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ग्रोथची "प्रगती' रोखली. फेडररने ही लढत ६-४, ६-४, ७-६ (७-५), ६-२ ने जिंकली.

गत विजेती पेत्रा पराभूत
माजी चॅम्पियन पेत्रा क्विताेवाचे स्पर्धेतील अाव्हान शनिवारी संपुष्टात अाले. तिला महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत अनपेक्षितपणे पराभवाला सामाेरे जावे लागले. जेलेना जांकाेविकने दुसऱ्या मानांकित पेत्रावर ३-६, ७-५, ६-४ ने मात केली.

मॅरेथॉन सामना
पुरुष एकेरीत क्रोएशियाचाच्या मरिन सिलिचने अमेरिकेच्या जॉन इस्नरचे आव्हान पाच सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत मोडून काढले. ही लढत तब्बल ४ तास आणि ३१ मिनिटे रंगली. यात सिलिचने ७-६ (७-४), ६-७ (६-८), ६-४, ६-७ (४-७), १२-१० ने जिंकली. सामन्यात सिलिचने ३५ तर इस्नरने ३७ ऐस मारले. सिलिचने ८५ तर इस्नरने ७४ विनर्स मारून सामन्यांत रंगत आणली. शेवटचा पाचवा सेटही १२-१० असा झाला. एकेक गुणांसाठी दोन्ही खेळाडू झगडत होते.

वोज्नियाकी जिंकली
जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकीने इटलीच्या जिओर्जीला सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. वोज्नियाकीने १ तास आणि ११ मिनिटांत हा सामना ६-२, ६-२ ने जिंकला. तिने विरोधी खेळाडूला मुंडके वर काढण्याची संधीच दिली नाही. अनुभवाच्या बळावर तिने विजय मिळवला.

सानियाचा डबल धमाका; पेस विजयी
सानिया मिर्झाने विजयाचा डबल धमाका उडवला. तिने महिला व मिश्र दुहेरीत शानदार विजयाची नाेंद केली. तिने मार्टिना हिंगीससाेबत महिला दुहेरीत जपानची किमिको व इटलीची फ्रान्सेस्का शियावोनला ६-०, ६-१ ने हरवले. दुसरीकडे मिश्र दुहेरीत सानियाने साेरेससाेबत हुसराेवा व अांद्रे बेगमेनला ५-७, ७-६, ७-६, ७-५ ने पराभूत केले. तसेच लिएंडर पेसने नेस्टरसाेबत पुरुष दुहेरीत रशियाच्या गाबाशिल्व व लुचा ७-५, ६-७, ६-७, ५-७ ने पराभव केला.

नदालला हरवणारा हरला
स्पेनचा नंबर वन खेळाडू आणि माजी चॅम्पियन राफेल नदालला दुसऱ्या फेरीत पराभूत करून धक्कादायक विजय मिळवणाऱ्या जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनला सर्बियाच्या ट्रोव्हिस्कीने ६-४, ७-६, ४-६, ६-३ ने हरवले. नदालला हरवणाराही अखेर हरला.