नवी दिल्ली- जगातील माजी नंबर वन सायना नेहवालने इंडिया अाेपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अाता भारताची ही खेळाडू किताबापासून अवघ्या दाेन पावलांवर अाहे. तिने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात राेमहर्षक विजय संपादन केला. दुसरीकडे भारताची सिंधू, सहदेव माेहिता अाणि संजना संताेषला महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. यासह ही जाेडी स्पर्धेतून बाहेर पडली अाहे.
सायनाने अंतिम अाठमध्ये काेरियाच्या संुग जि ह्यूनचा पराभव केला. तिने १९-२१, २१-१४, २१-१९ अशा फरकाने सामना जिंकला. यासह एक तास २३ मिनिटांमध्ये तिला अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. अाता तिचा उपांत्य फेरीतील सामना तिसऱ्या मानांकित झुईरुई लीशी हाेणार अाहे.
दमदार सुरुवात करणाऱ्या सायनाचे पहिल्या गेममधील अापले डावपेच सपशेल अपयशी ठरलेे. पाचव्या मानांकित सुंगने सरस खेळी करताना पहिला गेम जिंकला. यासह तिने लढतीत अाघाडी मिळवली. मात्र, त्यानंतर दुसऱ्या मानांकित सायनाने दमदार पुनरागमन केले. यासह तिने दुसऱ्या गेममध्ये सहज बाजी मारून लढतीत बराेबरी साधली. तिने हा गेम २१-१४ ने जिंकला. त्यानंतर दाेन्ही खेळाडूंंमधील झुंज तिसऱ्या अाणि निर्णायक गेममध्ये रंगली. सुंगनेही सरस खेळी करून लढतीवर पकड घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा प्रयत्न सायनासमाेर थिटा पडला. भारताच्या खेळाडूने अव्वल कामगिरी करताना तिसरा गेम जिंकून सामना अापल्या नावे केला. अवघ्या दाेन गुणांच्या अाघाडीने सायनाने तिसरा गेम २१-१९ ने जिंकला.
वांग बाहेर; झुईरुई अंतिम चारमध्ये
सहाव्या मानांकित शिजियान वांगला पराभवाला सामाेरे जावे लागले. तिला तिसऱ्या मानांकित झुईरुईने धूळ चारली. झुईरुईने २२-२०, १२-२१, २१-१७ ने विजय मिळवला. यासह तिने एक तास मिनिटांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला.