टोकियो - जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावर असलेली भारतीय शटलर सायना नेहवाल आणि तिसरा सिडेड किदांबी श्रीकांतने जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत दणकेबाज खेळासह विजयी सुरुवात करून दुसर्या फेरीत मजल मारली.
मात्र, पी. व्ही. सिंधू आणि महिला दुहेरीतील तज्ज्ञ जोडी ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पाला पहिल्याच फेरीत अपयश आले.
सायनाने दोन लाख ७५ हजार डाॅलर्स पुरस्कार रकमेच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबुमरुंगपानला ४२ मिनिटांत २१-१४, २२-२० ने पाणी पाजले. सायनाने पहिला गेम अगदी सहज जिंकला. दुसर्या सेटमध्ये सायनाने बुसनानचे आव्हान २२-२० ने मोडीत काढले.
के. श्रीकांतने ३४ मिनिटांत आयर्लंडच्या स्कॉट इव्हान्सला २१-१८, २१-१५ ने नमवले. जपानच्या मिनात्सू मितानीने जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानावरील पी. व्ही. सिंधूला २१-१३, १७-२१, २१-११ ने नमवले.
ज्वाला-अश्विनीचा महिला दुहेरीत पराभव
ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या महिला दुहेरीतील भारताच्या तज्ज्ञ जोडीला चीनच्या आठव्या सिडेड झाओ युएनलेई व झोंग कियानशिनकडून कडवी झुंज मिळाली. ५४ मिनिटे रंगलेल्या लढतीत २०-२२, २१-१८, १३-२१ ने भारतीय जोडीला अपयश आल्यामुळे ती पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर झाली.