आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धामध्ये सायनाची सेमीफायनलमध्ये धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुझोऊ- जगातील माजी नंबर वन सायना नेहवालने विजयी मोहीम अबाधित ठेवताना चायना ओेपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तिने शुक्रवारी महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत शानदार एकतर्फी विजयाची नोंद केली. यासह तिने अंतिम चारमधील आपला प्रवेश निश्चित केला.

अव्वल मानांकित सायनाने एकेरीच्या लढतीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला सरळ दाेन गेममध्ये धूळ चारली. तिने २१-१६, २१-१३ अशा फरकाने सामना जिंकला. आक्रमक खेळी करताना तिने अवघ्या ४२ मिनिटांमध्ये जपानच्या ओकुहाराचे आव्हान संपुष्टात आणले. यामुळे जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या ओकुहाराला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
भारताच्या सायना नेहवालचा जपानच्या ओेकुहाराविरुद्धचा हा सलग चौथा विजय ठरला. तिने शानदार खेळी करून विजयश्री खेचून आणली. त्यामुळे आता सायना महिला एकेरीच्या किताबापासून अवघ्या दोन पावलावर आहे.

सिंधूची झुंज अपयशी : जागतिक स्पर्धेतील दोन वेळची कांस्यपदक विजेत्या सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम १६ मध्ये दिलेली झुंज अपयशी ठरली. तिला चीनच्या वांग शिजियानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. चीनच्या खेळाडूने सिंधूवर १८-२१, २१-१८, २१-१६ अशा फरकाने मात केली. पहिला सेट जिंकून दमदार सुरुवात करणाऱ्या सिंधूने वांगविरुद्ध एक तास २८ मिनिटे झुंज दिली. मात्र, तिला दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये समाधानकारक खेळी करता आली नाही. वांगने सरस खेळीच्या बळावर दोन्ही गेम जिंकून सामना आपल्या नावे केला.

चेन लोंगची आगेकूच
अव्वल मानांकित चेन लोंगने पुरुष एकेरीच्या अंतिम आठमधील सामना जिंकला. त्याने सातव्या मानांकित व्हिक्टर अक्लेसनचा पराभव केला. चीनच्या लोंगने ५० मिनिटांत एकतर्फी विजय मिळवला. त्याने २१-१७, २१-१३ अशा फरकाने सामना जिंकला.