आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Badminton: सायना, श्रीकांतकडून प्रशिक्षकांना पदकांची अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिम्पिकमध्‍ये कांस्यपदक विजेती सायना नेहवाल व किदम्बी श्रीकांत यांच्याकडून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत मला पदकांची अपेक्षा आहे, असा आत्मविश्वास भारताचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केला आहे. जकार्ता येथे १० ते १६ ऑगस्टदरम्यान जागतिक बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्‍यात येणार आहे.
भारतीय खेळांडूच्या तयारीविषयी गोपीचंद यांनी मत मांडले, '' भारतीय खेळाडू जागतिक क्रमवारीत कोणत्‍या स्थानावर आहे हे महत्त्वाचे नाही. ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची असून त्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यावरच आमच्या खेळाडूंचा भर राहणार आहे. पदक मिळविण्याची क्षमता असलेले खेळाडू संघात आहेत, मात्र या खेळाडूंनी पूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेत खेळले पाहिजे. या स्पर्धेसाठी सराव शिबिरात खेळाडूंची चांगली तयारी झाली आहे.'' असे मत त्‍यांनी मांडले आहे.
यांच्‍याकडूनही आहेत अपेक्षा
'' प्रत्यक्ष सामन्याच्‍या दिवशी आपली कामगिरी कशी असते यावर यशापयश अवलंबून असते. सायना व श्रीकांत यांच्याबरोबरच पारुपल्ली कश्यप, पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणोय यांच्याकडूनही मला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. प्रणोय हा दुखापतीमधून नुकताच तंदुरुस्त झाला आहे. त्याच्या सहभागाबाबत व तयारीविषयी मला खात्री आहे.'' असेही गोपीचंद यांनी म्‍हटले आहे.
सिंधू पूर्णपणे तंदुरुस्त
डाव्या पायाला फ्रॅक्चर झालेली सिंधू या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झाली आहे. त्यानंतर तिने एप्रिलमध्ये आशियाई स्पर्धेतही भाग घेतला होता. ''सरावापासून तीन महिने ती दूर होती. त्यामुळे तिच्याकडून सर्वोत्तम यश अपेक्षित नाही. मात्र स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका अनुकूल लाभली तर ती खूप चांगले यश मिळवू शकेल.'' असे गोपीचंद तिच्याविषयी म्हणाले.