आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना, सिंधूची नजर आता फ्रेंच ओपनवर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - फ्रेंच ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. तब्बल २७५,००० डॉलरचे बक्षीस असलेल्या या स्पर्धेच्या किताबावर जगातील नंबर वन सायना नेहवाल आणि डेन्मार्क ओपनच्या उपविजेत्या पी. व्ही. सिंधूची खास नजर असेल. या दोन्ही अव्वल खेळाडू स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करतील. दोन दिवसांपूर्वी जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या सिंधूने डेन्मार्क ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावले.

सिंधूचा दावा प्रबळ : डेन्मार्क ओपनमध्ये कॅरोलिना मरिनला पराभूत करण्याचा भीमपराक्रम सिंधूने गाजवला. यासह तिने फ्रेंच ओपनच्या जेतेपदाचा दावा मजबूत केला. सिंधूचा सलामी सामना चीनच्या वांग शिजियानशी होईल. सायनासमोर सलामीला मिचेलचे आव्हान असेल.
कश्यप, श्रीकांतकडून आशा : राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन पी.कश्यप आणि के. श्रीकांतकडून भारतीय संघाला सोनेरी यशाची आशा आहे. पुरुष एकेरीत हे दोन्ही युवा खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील. आठव्या मानांकित कश्यपचा दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल. तसेच पाचव्या मानांकित श्रीकांतचा सलामी सामना चीनच्या तैन होऊवेईशी होईल. तसेच एचएस प्रणयसमोर सलामीला तिसऱ्या मानांकित लीन डॅनचे तगडे आव्हान असेल.
प्रणीत, जयरामची वाट खडतर : स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताचा बी. साई प्रणीत आणि दोन वेळचा डच ओपन चॅम्पियन अजय जयरामची वाट खडतर मानली जात आहे. प्रणीतला पात्रता फेरीच्या लढतीत चीन-तैपेईच्या त्सू वेई वांगच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

ज्वाला-अश्विनी सज्ज
२०१० राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करतील. ही जोडी स्पर्धेतील आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. ज्वाला आणि अश्विनीचा सलामी सामना थायलंडच्या जोंगकोफान कितिथाराकुल आणि रविंदा प्राजोनगजाईशी होईल.