टाेकियाे- वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील राैप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू अाणि कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला गुरुवारी जपान सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. भारताच्या या दाेन्ही महिलांना खेळाडूंना दुसऱ्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. दुसरीकडे के. श्रीकांत अाणि एच. एस. प्रणयने अापली विजयी माेहीम कायम ठेवताना पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच पुरुष एकेरीमध्ये समीर वर्माचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. त्यालाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे स्पर्धेचा दुसरा दिवस भारतीय संघासाठी ‘कहीं खुशी, कहीं गम’ देणारा ठरला.
भारताच्या स्वस्तिकराज अाणि अश्विनी पाेनप्पाचा मिश्र दुहेरीत पराभव झाला. या जाेडीला चाैथ्या मानांकित प्रवीण जाॅर्डन अाणि सुसांटाे डेबीने पराभूत केले. चाैथ्या मानांकित जाेडीने २९-२७, १६-२१, २१-१२ अशा फरकाने सामना जिंकला.
त्यापाठाेपाठ दुसऱ्या मानांकित युकी शीने लढतीमध्ये समीर वर्माला पराभूत केले. त्याने १०-२१,२१-१७, २१-१५ अशा फरकाने विजय मिळवला. चांगली सुरुवात करूनही समीरला अापली लय कायम ठेवता अाली नाही. त्यामुळे त्याचा पराभव झाला.
अाेकुहाराकडून सिंधूचा पराभव
वर्ल्ड चॅम्पियन नाेजाेमी अाेकुहाराने पुन्हा एकदा अापले वर्चस्व प्रस्थापित करताना भारताच्या सिंधूला धूळ चारली. तिने २१-१८, २१-८ असा एकतर्फी विजय संपादन केला. यासह तिने ४८ मिनिटांमध्ये सिंधूला बाहेरचा रस्ता दाखवला. अाठवडाभरात अाेकुहारा अाणि सिंधूची ही दुसरी लढत ठरली.
श्रीकांत २९ मिनिटांत विजयी
भारताच्या सुपरस्टार के. श्रीकांतने अाक्रमक खेळी करताना २९ मिनिटांमध्ये एकतर्फी विजय संपादन केला. त्याने लढतीमध्ये काेरियाच्या हू यिनचा पराभव केला. त्याने २१-१२, २१-११ ने सामना जिंकला. यासह त्याने अंतिम ८ मध्ये धडक मारली. त्याने दाेन्ही गेमवर सरस खेळी करताना हा झटपट विजय संपादन केला.
मरीनकडून सायना पराभूत
पाचव्या मानांकित अाणि माजी नंबर वन मरीन कॅराेलिनाने अंतिम १६ मध्ये सायनाला पराभूत केले. तिने २१-१६, २१-१३ ने सामना जिंकला. या पराभवामुळे सायनाला अवघ्या ४३ मिनिटांत पॅकअप करावे लागले. तिने विजयासाठी दिलेली झुंज अपुरी ठरली.
प्रणयची अागेकूच
भारताच्या बिगरमानांकित एच. एस. प्रणयने पुरुष एकेरीचा प्री-क्वार्टर फायनलचा सामना ६० मिनिटांमध्ये जिंकला. त्याने लढतीमध्ये हस्यू जेन हाअाेवर मात केली. त्याने सरस खेळी करताना २१-१६, २३-२१ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. या विजयाच्या बळावर त्याने अंतिम ८ मधील अापला प्रवेश निश्चित केला.