आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायना, सिंधू, समीर क्वार्टर फायनलमध्ये!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोऊलून (हाँगकाँग) - पाचवी मानांकित सायना नेहवालने सलग दुसऱ्या संघर्षपूर्ण सामन्यात विजय मिळवत जपानच्या सयाका सातोला २१-१८, ९-२१, २१-१६ ने हरवले. या विजयासह सायनाने हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. समीर वर्मानेसुद्धा शानदार कामगिरी करताना जपानच्या काजूमासा सकईला १९-२१, २१-१५, २१-११ ने हरवत अंतिम आठमध्ये प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत ११ व्या क्रमांकावर असलेल्या सायनाचा १४ व्या क्रमांकावरील काजूमासाविरुद्ध करिअर रेकॉर्ड ५-१ असा शानदार आहे. भारताची रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती सिंधूने शानदार प्रदर्शन करताना चीन तैयपैच्या हु या चिंग हिला २१-१०, २१-१४ ने सहजपणे हरवले. सिंधूने दोन्ही गेममध्ये आक्रमक खेळ करताना चिंगला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.

समीरने हा सामना ५३ मिनिटांत जिंकला. मात्र, इतर एका सामन्यात भारताचा युवा खेळाडू एच.एस.प्रणयला मलेशियाच्या चोंग वेई फेंगने ५८ मिनिटांतील संघर्षपूर्ण लढतीत १५-२१, २१-११, २१-१५ ने मात दिली. प्रणयने पहिला गेम जिंकून चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्याला ही लय नंतर कायम ठेवता आली नाही.

सायनाने घेतले सलग सहा गुण
सायनाने आपली लय मिळवताना पहिला गेम सहजवणे २१-१८ ने जिंकला. सायना एकवेळ ११-१२ ने मागे पडली होती. यानंतर तिने सलग सहा गुण घेऊन स्कोअर १७-१२ असा केला. दुसऱ्या गेममध्ये सातोने शानदार पुनरागमन करताना सुरुवातीपासून अखेरपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. तिने दुसरा गेम २१-९ जिंकत सामन्यात १-१ ने बरोबरी केली. निर्णायक गेममध्ये सायनाने ७-१ ने मजबूत आघाडी घेतली. नंतर तिने ही आघाडी सलगपणे कायम ठेवली. एक वेळ स्कोअर १५-१४ असा होता. मात्र, सायनाने १८-१४ आणि २०-१५ च्या स्कोअरसह गेम २१-१६ ने संपवला.
सिंधू-सायना सामना शक्य
विश्व क्रमवारीत टॉप-१० मध्ये पोहोचलेली सिंधू आणि सायना क्वार्टर फायनलमध्ये पोहोचल्या आहेत. या दोघांत सेमीफायनलचा सामना रंगू शकतो. या दोन्ही भारतीय खेळाडू एकाच गटात असून, या दोघींपैकी एकजण फायनलमध्ये खेळू शकेल. क्वार्टर फायनलमध्ये सिंधूपुढे सिंगापूरच्या जिया ओयू लियांग हिचे आव्हान असेल.
सिंधू नवव्या स्थानी; आठ वर्षानंतर सायना टॉप-१० बाहेर
जबरदस्त फॉर्मात असलेली भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधूने विश्व बॅडमिंटन क्रमवारीत टॉप-१० महिलांत प्रवेश केला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर सिंधूने मागच्या आठवड्यात चायना ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावले होते. गुरुवारी जाहीर क्रमवारीनुसार सिंधूने दोन स्थानांच्या प्रगतीसह नववे स्थान मिळवले. तिच्या नावे आता ६४७४९ रेटिंग गुण आहेत. दुसरीकडे गुडघ्याच्या दुखापतीमुळे गेले काही दिवस कोर्टबाहेर असलेल्या सायनाचे क्रमवारीत नुकसान झाले. सायनाच्या रॅकिंगमध्ये पाच स्थानांची घसरण झाली असून, ती ११ व्या क्रमांकावर आली आहे. सायनाच्या नावे ६३७१९ रेटिंग गुण आहेत. आठ वर्षानंतर सायना टाॅप-१० च्या बाहेर झाली. महिला एकेरीत स्पेनची कॅरोलिन मरिन नंबर वन आहे. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत १२ व्या तर अजय जयराम १९ व्या क्रमांकावर आहे.
बातम्या आणखी आहेत...