आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाँगकाँग ओपन : सायना विजयी ट्रॅकवर; सिंधू, जयरामही जिंकले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काऊलून (हाँगकाँग) - दुखापतीतून सावरल्यानंतर जागतिक क्रमवारीतील सहाव्या क्रमांकाची भारताची खेळाडू सायना नेहवाल हळूहळू लयीत येत आहे. पाचवी मानांकित सायनाने हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. बिगर मानांकित पी.व्ही. सिंधूने सहजपणे दुसरी फेरी गाठली. पुरुषांत अजय जयराम, एच. एस. प्रणय आणि समीर वर्मा यांनी आपापले सामने जिंकत आगेकूच केली.

गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर आपल्या दुसऱ्या स्पर्धेत खेळणाऱ्या सायनाने जवळपास तीन महिन्यांनी पहिला विजय मिळवला. सायनाने ५६ मिनिटांच्या संघर्षपूर्ण सामन्यात थायलंडच्या पोर्नटिप बुरानाप्रार्सेटुकला १२-२१, २१-१९, २१-१७ ने पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सायनाने पोर्नटिपला १० वेळा हरवले असून दोन वेळा सायनासुद्धा हरली आहे. पुढच्या फेरीत सायनाचा सामना जपानच्या सायाका सातो हिच्याशी होईल. जागतिक क्रमवारीत १४ व्या क्रमांकावर असलेल्या सातोचा सायनाशी आतापर्यंत सहा वेळा सामना झाला असून यात पाच वेळा सायनाने तिला हरवले आहे.

इतर एका सामन्यात भारताच्या समीर वर्माने जपानच्या ताकुमा उएदाला ५१ मिनिटांत २२-२०, २१-१८ ने विजय मिळवून पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुढच्या फेरीत समीरचा सामना जपानच्या काजुमासा साकाईशी होईल. जागतिक क्रमवारीत २७ व्या क्रमांकावर असलेल्या प्रणयने चीनचा खेळाडू कियाओ बिनला ४८ मिनिटांत २१-१६, २१-१८ ने मात दिली. इतर एका सामन्यात अजय जयरामने इंडोनेशियाच्या अँथनी गिटिंगला ५६ मिनिआंत २१-१५, १३-२१, २१-१६ ने मात दिली. जयरामचा पुढचा सामना चीनच्या हुआंग युजियांगशी होईल.
ऑलिम्पिक स्टार पी.व्ही. सिंधूचा सोपा विजय
बिगर मानांकित सिंधूने इंडोनेशियाच्या सुशांतो युलिया योसेफिनला ३२ मिनिटांत २१-१३, २१-१६ ने हरवले. तिने पहिला गेम सहजपणे जिंकला. दुसऱ्या गेममध्ये १४-१६ ने मागे पडल्यानंतर सलग सात गुण घेत सिंधूने २१-१६ ने गेम तसेेच सामना संपवला. दुसऱ्या फेरीत सिंधूचा सामना तैयपैच्या सू या चिंग हिच्याशी होईल.
५६ मिनिटे रंगला संघर्षपूर्ण सामना
१२-२१, पहिला गेम
२१-१९, दुसरा गेम
२१-१७ तिसरा गेम
बातम्या आणखी आहेत...