औरंगाबाद - दक्षिण अमेरिकेत झालेल्या जागतिक युवा (१८ वर्षांखालील) मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची युवा खेळाडू साक्षी चितलांगेने जबरदस्त कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. तिने स्पर्धेत एकूण ८ गुणांची कमाई केली. अखेरच्या सामन्यात साक्षीने पांढऱ्या सोंगट्यावर पोलंडच्या जुलियाचा ४६ चालीत पराभव करत रौप्यपदक जिंकले.
स्पर्धेत स्लोवेनियाची उनुक लॉरा हिने विजेतेपद पटकावले. या कामगिरीमुळे साक्षीने पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळवला. नुकतेच राष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत रौप्यपदक पटकावत तिने पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई आणि जागतिक युवा ज्युनियर बुद्धिबळ (२० वर्षे) स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. या स्पर्धेतून साक्षीला तब्बल ११६ आंतरराष्ट्रीय गुणांची कमाई झाली असून तिचे आंतरराष्ट्रीय रेटिंग आता २२८१ होईल. मोठ्या गटात पदक पटकावणारी साक्षी पहिला खेळाडू ठरली आहे.