आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन ओपन टेनिस: सानिया उपांत्य फेरीत दाखल; व्हीनसचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाने आपली चिनी जोडीदार शुआई पेंग हिच्यासोबत जबरदस्त प्रदर्शन करत अमेरिकन ओपन टेनिसच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सानियाचा हा चालू वर्षातील पहिला ग्रँडस्लॅम उपांत्य सामना आहे. सानिया व पेंग   
जोडीने महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत टिमिया बाबोस आणि आंद्रिया लावास्कोवा जोडीला सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. चौथ्या मानांकित सानिया व पेंग जोडीने पाचव्या मानांकित हंगेरीच्या बाबाेस व चेक गणराज्याच्या आंद्रियाला ७-६, ६-४ ने मात दिली. सानियाचे हे चालू वर्षातील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ठरले. ऑस्ट्रेलियन ओपन व विम्बडनमध्ये ती तिसऱ्या आणि फ्रेंच ओपनमध्ये पहिल्याच फेरीत बाहेर झाली होती. आता सानिया व पेंगचा सामना दुसऱ्या मानांकित मार्टिना हिंगीस आणि युंग जान चान या जोडीविरुद्ध होईल.
 
चानने बेल्जियमच्या कस्टन फ्लिपकेन्ससोबत मिळून सानियाला विम्बडनमध्ये पराभूत केले होते. यंदाच्या सत्रात सानियाने आपली जोडीदार बदलली. सुरुवातीला ती बार्बोरा स्ट्रायकोवासोबत खेळली. मात्र ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिसऱ्या फेरीतून बाहेर पडली. फ्रेंच ओपनमध्ये ती यारोस्लावा श्वेदोवासोबत खेळली. या स्पर्धेतही पहिल्याच सामन्यात मात खावी लागली. यंदा सानियाने फक्त एक किताब आपल्या नावे केला.

स्टीफन्सने केले व्हीनस विल्यम्सला बाहेर 
स्लोएने स्टीफन्सने आपली लहानपणीची आदर्श सात वेळची चॅम्पियन व्हीनस विल्यम्सला सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का दिला. स्टीफन्सने आपली देश सहकारी व्हीनसला ६-१, ०-६, ७-५ ने मात िदली. डाव्या पायाच्या दुखापतीमुळे जवळपास ११ महिने कोर्टपासून दूर राहिलेल्या स्टीफन्सने ऑगस्टमध्ये पुनरागमन केल्यावर ती ९५७ व्या स्थानावर होती. तिने तीन स्पर्धेतील पराभवानंतर थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवत ८३ व्या स्थानावर झेप घेतली. आता तिचा सामना मेडिसन कीसविरुद्ध होईल. अमेरिकेची १५ वी मानांकित कीसने मनगटाच्या दुखापतीतून १० महिन्यांनी बाहेर पडत बाजी मारली. तिने २० व्या मानांकित कोको वांडेवेगेला हिला ६-१, ६-२ ने हरवले. 

१५ वर्षांनी दोन अमेरिकन खेळाडू समोरासमोर 
तब्बल १५ वर्षांनंतर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत फायनलमध्ये दोन अमेरिकन खेळाडू समोरासमोर आल्या आहेत. यापूर्वी २००२ मध्ये सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स या भगिनींमध्ये फायनल रंगली होती. या सामन्यात सेरेना विल्यम्सने व्हीनसला पराभूत करत किताब जिंकला होता. आता स्टीफन्स आणि कीस या जवळच्या मैत्रिणी असून फेडरेशन कप टीममध्ये त्या सोबत खेळल्या आहेत. या दोघींत एकमेव सामना मियामी ओपन २०१५ मध्ये झाला होता. यात स्टीफन्स जिंकली होती. 
बातम्या आणखी आहेत...